महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम लवकरच वाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या ‘विजयी संकल्प मेळावा’त मोठा दावा करताना सांगितले की, दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होईल आणि महापालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हीच खरी लोकशाही: चंद्रकांत पाटील
लोकसभा किंवा विधानसभेपेक्षा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका या निवडणुका ही खऱ्या अर्थाने लोकशाहीतील खरी निवडणूक असते, असे पाटील म्हणाले. “कदाचित आज (4 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंतच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते. माझा निवडणूक आयोगाशी काही संबंध नाही, पण 40 मी वर्षे राजकारणात घालवली आहेत, त्यामुळे अनुभवाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करतोय,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “2019 साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या चंद्रशेखर बावनकुळे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले. निवडणूक ही जलदगती ट्रेनसारखी असते. जो प्लॅटफॉर्मवर उभा राहील, तो मागे राहील. मात्र नाराज होऊ नका. राजकारणात केवळ प्रयत्न पुरेसे नसतात, त्यासोबत नशीबही लागतं. येणाऱ्या दिवाळीचा फायदा घेऊन लोकांशी संपर्क वाढवा. महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे, पण शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील.”
उद्धव ठाकरेंवर केली टीका :
2019 च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. “तेव्हा उद्धव ठाकरेंनी थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करावी लागली नसती. पण नियती ही नियतीच असते. २०१९ मध्ये सरकार जाणं हे नियतीचं काम होतं. पण या सगळ्यात उद्धव ठाकरेंना काय मिळालं?” असा सवालही त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संदेश देताना म्हटलं की, “मी कधीच तिकीट मागितलं नाही. नेत्याची इच्छा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आज्ञा असते. निवडणुका येतात-जातात, पण पक्षासाठी काम करणं थांबता कामा नये.”