दि. ५ (पीसीबी) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं की, दिवाळीनंतर डिसेंबर-जानेवारी महिन्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ही माहिती दिल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. टप्प्याटप्प्याने निवडणुका पार पडणार असून, सध्या त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नव्या प्रभाग रचनेवर सुप्रीम कोर्टाची संमती मिळाल्याने या निवडणुका घेण्यास मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईत जुन्याच प्रभागांनुसार निवडणूक; इतर शहरांमध्ये चार सदस्यीय प्रभाग :
मुंबई महानगरपालिकेत निवडणूक 227 जुन्या प्रभागांनुसार होणार आहे. आधी महाविकास आघाडी सरकारने हे प्रभाग 236 पर्यंत वाढवले होते. मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हे पुन्हा 227 वर आणले गेले. याला आव्हान देण्यात आलं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, त्यामुळे आता मुंबईमध्ये 227 प्रभाग कायम राहणार आहेत.
दुसरीकडे पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यात येणार आहे. ही नवी रचना निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि प्रतिनिधिक करण्यासाठी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने नव्या प्रभाग रचनेला मंजुरी दिल्यानंतर त्याविरोधात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने आता ओबीसी आरक्षणासह निवडणुका होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका नव्या रचनेनुसारच पार पडणार आहेत.
या निर्णयामुळे पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर आणि इतर महानगरपालिकांमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण कायम राहिल्यामुळे स्थानिक नेत्यांना संधी मिळेल, आणि समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे