सोलापूर,दि . १० ( पीसीबी ) : अहिल्यानगरमध्ये गुरुवारी एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली. या सभेत एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीकेची झोड उठवली. आधी एक छोटासा चिंटू होता, आता चिकणी चमेली आली आहे, असे म्हणत संग्राम जगताप यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. दरम्यान, आज करमाळा येथील हिंद जन आक्रोश मोर्चात संग्राम जगताप यांनी मोर्चाला आवाहन करताना दिवाळीची खरेदी हिंदूंकडून करण्याची विनंती केली आहे. येणाऱ्या दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा, असेही त्यांनी म्हटले.
दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाल्यानंतर संग्राम जगताप यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे आपला पक्ष धर्मनिरपेक्षता मानणारा आणि सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारा आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा जपणारा, यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढे नेणारा असल्याचे सातत्याने सांगतात. मात्र, त्यांच्याच पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केवळ हिंदूंकडूनच करा, असे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
करमाळा येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप , जायंट किलर आमदार अमोल खताळ हे उपस्थित होते. या मोर्चात ठिकठिकाणी जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. इम्तियाज जलील यांनी जगताप यांच्यावर केलेल्या जहरी टीकेला आज संग्राम जगताप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, आज या टीकेवर बोलणे टाळत याचे उत्तर अहिल्यानगर येथे जाहीर सभेत देणार असल्याचेही आमदार जगताप यांनी म्हटले.