दिवसाला 30 कुत्र्यांची होणार शस्त्रक्रिया

0
372

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका, Canaine Control and Care आणि PFA यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या श्वान संतती नियमन शस्त्रक्रियेच्या विस्तारीत युनिटचे पालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते आज (बुधवारी) उद्घाटन करण्यात आले. या युनिटमुळे पिज-यांची संख्या 130 इतकी झाली असून संतती नियमन शस्त्रक्रियेत वाढ होणार आहे. प्रतिदिन 28 ते 30 शस्त्रक्रिया होणार आहेत.

पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे आदी यावेळी उपस्थित होते. श्वान संतती नियमन शस्त्रक्रियेच्या विस्तारीत युनिटच्या कामाअंतर्गत नवीन 58 पिंजरे तयार केले आहेत. पूर्वीचे 72 पिंजरे आणि नवीन 58 अशी पिंज-यांची संख्या 130 इतकी झाली आहे. सध्या या केंद्रात प्रतिदिन 15 शस्त्रक्रिया होत होत्या. नवीन पिंजरे सेवेत दाखल झाल्याने ही संख्या प्रतिदिन 28 ते 30 होणार आहे. यामुळे वार्षिक 10 हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया शक्य होतील. सध्या महापालिका Female Dog वर शस्त्रक्रिया करण्यावर भर देत असून एकूण शस्त्रक्रियेच्या 90 टक्के शस्त्रक्रिया या Female dog च्या होतात.

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी आणखी किमान 100 पिंजरे गरजेचे आहेत. प्रतिदिन 50 नसबंदी शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. यासाठी येत्या 6 महिन्यात आणखी 100 पिंजरे तयार केले जाणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत नेहरूनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्र एकात्मिक प्राणी नियोजन केंद्र म्हणून तयार होत आहे. या ठिकाणी भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. श्वान उपचार केंद्रासोबत श्वान निर्बीजीकरण केंद्र, लहान प्राणी दहन मशीन, मोठ्या प्राण्यांसाठी दहन मशीन, Dog catcher वाहने, cattle catcher वाहने, फिरती रुग्णवाहिका उपलब्ध आहे. प्राणी संख्या नियंत्रण आणि उपचार सुविधा यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या काळात श्वान नसबंदी शस्त्रक्रिया संख्या वाढवण्यावर भर राहणार असल्याचे उपायुक्त ढोले यांनी सांगितले.