दिवंगत लक्ष्मण जगताप आणि आमदार लांडगे यांना राष्ट्रवादीमुळेच संधी दिली. अन्यथा यांच्याकडे काय होते?

0
237

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य केले. सांगवीत झालेल्या सांगता सभेत दिवंगत लक्ष्मण जगताप आणि आमदार लांडगे यांना राष्ट्रवादीमुळेच संधी दिली. अन्यथा यांच्याकडे काय होते? असा सवाल उपस्थित केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा गुरुवारी थंडावल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराची सांगता सांगवीत झाली. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सभा झाली.

अजित पवार म्हणाले की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना १९९२ ते २०१४ पर्यंत आपण मदत केली. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर आणि आमदार अशी सर्व पदे दिली. त्यांच्याकडे काय होते? ते पूर्वी घरी कसे बसायचे? हे येथील लोकांना माहिती आहे.

तसेच, ‘‘भोसरीचा आमदार माझ्याकडे स्थायी समिती सभापती पद द्या म्हणून जिजाई निवासस्थानी आला होता. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे हेसुद्धा उपस्थित होते. विलास लांडे मला म्हणाले, याला स्थायी समिती अध्यक्ष करु नका, नाहीत हा आमदारकीला उभा राहणार. मी म्हणालो, अरे तुझा हा नातेवाईक आहे. कुठे जाणार आहे? पण, स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले की, याला तीन हत्तीचे बळ आले. सगळं मलाच पाहिजे, अशी यांची भावना होते, अशा शब्दांत आमदार लांडगे यांना फटकारले.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी ज्या ठिकाणी फिरुन आलो, त्याच ठिकाणी रॅली काढावी लागते. मुख्यमंत्री कधी रॅली काढतो का? सभा घेतो आणि निघून जातो, असा शेलक्या शब्दांत अजित पवार यांनी समाचार घेतला आहे.

जगताप, लांडगेंवर पवारांचा राग का?

२०१४ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शास्तीकर, अनधिकृत बांधकाम या मुद्यावर राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यानंतर जगताप यांनी भाजपाच्या तिकीटावर चिंचवडची विधानसभा जिंकली. त्याचवेळी भोसरी मतदार संघात आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे लांडगे यांनी अपक्ष निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१६ मध्ये लांडगे यांची समर्थकांसह भाजपात अधिकृत प्रवेश केला. परिणामी, २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. पुन्हा २०१९ मध्ये जगताप आणि लांडगे यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. चिंचवड आणि भोसरी मतदार संघात राष्ट्रवादीला अधिकृत उमेदवारही देता आला नव्हता. त्यामुळे जगताप आणि लांडगे यांच्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा राग आहे. तो राग प्रचार सभेत निघाला