दि.११(पीसीबी) -देशाच्या राजधानीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर दिल्ली हादरली आहे. संध्याकाळी ६:५२ वाजता झालेल्या या स्फोटात ९ जणांचा मृत्यू, तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. तपासात आता मोठं षडयंत्र उघडकीस येत असून, चार डॉक्टरांचा या स्फोटाशी संबंध असल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.
तपासात समोर आलं आहे की, हा स्फोट i20 कारमध्ये झाला. घटनेच्या तीन तास आधी ही कार सुनहरी मशिदीजवळ उभी असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे. स्फोटानंतर घटनास्थळी स्पेशल सेलला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, हे आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत.तपासादरम्यान देशभरात वेगवेगळ्या राज्यांतून चार डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मिळालेल्या शस्त्रास्त्रांमुळे आणि रासायनिक पदार्थांमुळे तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.
अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. आदिल राठरच्या लॉकरमध्ये AK-47 रायफल आढळली. त्याचे संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.हरियाणाच्या फरीदाबादमधील अल-फलाह यूनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असलेल्या लखनऊच्या महिला डॉक्टर शाहीन शाहिदच्या कारमध्ये “कॅरोम कॉक” नावाची असॉल्ट रायफल आढळली. तिचा या नेटवर्कमधील रोल तपासला जात आहे. पोलिसांनी तिची अधिकृत ओळख सध्या गुप्त ठेवली आहे.
गुजरात एटीएसने अटक केलेल्या डॉ. सैयदने चीनमध्ये शिक्षण घेतले असून तो “रिसिन” हे अत्यंत घातक विष तयार करत होता. तपासात समोर आलं की त्याने दिल्ली आजादपूर मंडी, अहमदाबाद नरोडा मार्केट आणि लखनऊतील RSS कार्यालय यांची रेकी केली होती. रिसिन हे जैविक शस्त्र म्हणून वापरले जाणारे प्राणघातक विष आहे.१० नोव्हेंबर रोजी फरीदाबादमध्ये अटक झालेल्या या डॉक्टरकडे ३६० किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. बॉम्ब तयार करण्यासाठी याचाच वापर होतो. त्याच्या इतर ठिकाणांवर झालेल्या छाप्यांमध्ये २.५ टन स्फोटक साहित्य पोलिसांनी जप्त केलं. शकीलचे संबंधही जैश-ए-मोहम्मद संघटनेशी असल्याचा संशय आहे.
दिल्ली स्पेशल सेल, NIA आणि IB यांचे पथक या सर्व अटकसत्रांची सांगड घालत तपास करत आहेत. चारही डॉक्टरांमध्ये काही सुसंगत कनेक्शन असल्याचे पुरावे मिळत असून, स्फोटामागे वैज्ञानिक आणि दहशतवादी एकत्र येऊन आखलेले नेटवर्क असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
देशभरात सतर्कता वाढवली
या उघडकीनंतर दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. रासायनिक आणि स्फोटक पदार्थांच्या अवैध व्यवहारावर देखरेख वाढवण्यात आली आहे.दिल्लीतील या स्फोटाने केवळ सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले नाही, तर शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात लपलेल्या इंटेलेक्चुअल टेरर नेटवर्क चा धोकाही उघड केला आहे. चार डॉक्टरांच्या अटकेमुळे तपासाचा फोकस आता वैद्यकीय क्षेत्रात तयार होणाऱ्या जैविक आणि रासायनिक शस्त्रांकडे वळला आहे.तपास संस्थांकडून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











































