नवी दिल्ली,दि.०३(पीसीबी) – दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील मोठ्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुमारे एक मिनिट भूकंपाचे धक्के जाणवत होते आणि इमारती देखील हादरत राहिल्या.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवण्यात आली होती, मात्र ती खूप जास्त जाणवली. दिल्ली-एनसीआरसह हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या मोठ्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता आणि त्याची खोली पृथ्वीपासून १० किलोमीटर खाली होती. नेपाळमध्ये आज दुपारी २:२५ वाजता ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा तर २:५१ वाजता ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला.
उंच इमारती असलेल्या भागात हा भूकंप मोठ्या तीव्रतेने जाणवला. एकापाठोपाठ एक धक्के जाणवत राहिले. दिल्ली-एनसीआरमध्ये लोक इमारतींमधून बाहेर धावलेआणि बाहेर गर्दी दिसून आली. घरातील पंखे, फर्निचर थरथरायला लागले आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सध्या या भूकंपाचा किती परिणाम झाला याची माहिती गोळा केली जात आहे.