दि. १३(पीसीबी) लोकसभा, राज्यसभा खासदारांच्या गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबविणाऱ्या दिल्लीतील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या काॅन्सिटय़ूशन क्लबच्या निवडणुकीत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे विजयी झाले. महाराष्ट्रातून बारणे हे एकमेव उमेदवार होते. ते विजयी झाले. सर्वपक्षीयांशी असलेल्या संबंधांचा बारणे यांना या राजकारण, पक्षविरहित असलेल्या निवडणुकीत फायदा झाला.
लोकसभा, राज्यसभेच्या आजी-माजी खासदारांसाठी काॅन्सिटय़ूशन क्लब हा अधिकृत क्लब आहे. लोकसभेचे अध्यक्ष त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या क्लबवर भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी यांचे वर्चस्व आहे. सर्व पक्षातील खासदारांशी उत्तम संपर्क असलेलाच उमेदवार या निवडणुकीत निवडून येतो. कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या 2025 निवडणुकीत कार्यकारी सदस्यांच्या निवडणुकीसाठी 12 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सचिवपदासाठी राजीवप्रताप रुडी आणि संजीव बालियान यांच्यात लढत झाली. त्यात रुडी विजयी झाले. सदस्यपदाच्या 11 जागांसाठी 14 जणांनी अर्ज भरले होते. महाराष्ट्रातून खासदार श्रीरंग बारणे यांचा एकमेव अर्ज दाखल होता. लोकसभा, राज्यसभेच्या 669 विद्यमान व माजी खासदारांनी मतदान केले. या मतदानासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खर्गे, शत्रुघ्न सिन्हा, स्मृती इराणी, कंगना रणौत यांच्यासह लोकसभेचे विद्यमान व माजी सदस्य, कॉन्स्टिट्यूशन क्लबचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, यामध्ये महाराष्ट्राचे खासदार सर्वांधिक संख्येने उपस्थित होते. पक्षविरहित असलेल्या या निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
खासदार बारणे म्हणाले, ही निवडणूक पक्षविरहित असते. सर्वच पक्षांतील खासदारांशी असलेल्या संबंधांचा मला फायदा झाला. सर्वांनी विश्वास दाखवून मला क्लबमध्ये काम करण्याची संधी दिली. देशाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकारी सदस्य क्लबच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. विविध विभागांचे कामकाज पाहतात. महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या नियोजनात क्लबचे योगदान असते. खासदारांच्या गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन नवे उपक्रम राबविले जातात. क्लबमध्ये विविध सुखसुविधा असतात. क्लबच्या माध्यमातून वर्षेभर विविध उपक्रम राबविले जातात. पंतप्रधानही या कार्यक्रमात सहभागी होतात.