दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्याशिवाय राज्यात कोणताच निर्णय होत नाही

0
382

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : राज्यात सध्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान सरकारकडे बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला ? असा सवाल करत दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्याशिवाय राज्यात कोणताच निर्णय होत नाही असा टोला पवारांनी यावेळी शिंदे सरकारवर लावला आहे.

राज्यातील सरकारने तात्काळ विधिमंडळाचं अधिवेशन बोलावलं पाहिजे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला असा सवाल करत मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रातील जनतेकडे लक्ष नाही असा टोला लावला आहे.दरम्यान, काल तिरूपती बालाजी येथे शिवाजी महाराजांच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना ते म्हणाले की, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराजांबद्दल खोट्या बातम्या पसरवणं चुकीचं असून मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.

“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या हातात काहीच नसून त्यांना केंद्रातून हिरवा झेंडा दाखवल्याशिवाय कोणताच निर्णय घेतला जात नाही असं मला वाटतं.” असं म्हणत पवारांनी सरकारवर टोला लावला आहे.सध्या हवामान विभागाचेही निर्णय खरे ठरत नाहीत. हवामान विभागाने पाऊस पडणार नाही असं सांगितलं की पाऊस पडतो. त्यांनी रेड अलर्ट दिल्यामुळे शाळांना सुट्ट्या दिल्या आणि पाऊसच नाही, त्यामुळे त्यांच्यावरही विश्वास ठेवण्यासारखं राहिलं नाही. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पवारांनी केली आहे. त्याचबरोबर जीएसटी, व्यवस्थापन, मंत्रिमंडळ विस्तार, अधिवेशन, शेतकरी, ओला दुष्काळ अशा विषयांवर अजित पवारांनी सरकारवर निशाना साधला आहे.