दिल्लीतील ४० मजली ट्विन टॉवर रविवारी दुपारी होणार भुईसपाट

0
312

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातल्या ट्विन टॉवरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कारण दिल्लीच्या कुतुब मिनारहून जास्त उंची असलेले हे दोन जुळे टॉवर येत्या २८ ऑगस्ट रोजी अर्थात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास जमीनदोस्त केले जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दोन्ही इमारती पाडल्या जाणार आहेत. नॉयडाच्या सेक्टर ९३ मधील सुपरटेकच्या एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण प्रकल्पात इमारतविषयक नियमावलीचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे. त्यामुळे ४० मजल्यांच्या या दोन्ही इमारती पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, या प्रकरणापेक्षाही आता या इमारती पाडण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीतील एक कर्मचाऱ्याची जास्त चर्चा होऊ लागली आहे.

४९ वर्षीय चेतन दत्ता हे नोएडातील ट्विट टॉवर्स पाडण्याचं काम सोपवलेल्या एडिफिस इंजिनिअरिंग कंपनीत ब्लास्टर म्हणून नोकरीला आहेत. मोठमोठी बांधकामं अत्याधुनिक पद्धतीने पाडण्याची कामं या कंपनीमार्फत केली जातात. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रावर चेतन दत्ता हे स्फोट करणाऱ्या प्रणालीचं व्यवस्थापन करतात. नोएडामधले हे सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यासंदर्भात जेव्हापासून चर्चा सुरू झाली, तेव्हापासून दत्ता यांचं एक स्वप्न होतं. आणि आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे.

हे टॉवर पाडण्यासाठी ब्लास्टर म्हणून जबाबदारी चेतन दत्ता यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याविषयी दत्ता म्हणतात, “जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा यासंदर्भातला निकाल आला, तेव्हा कुणीतरी मला तो व्हॉट्सअॅपवर पाठवला. मी तेव्हा देवाकडे प्रार्थना केली की या इमारती पाडण्याची संधी मला मिळावी. ती खरंच मला मिळेल अशी मी अपेक्षाही केली नव्हती. पण काही काळाने जुलै महिन्यात एडिफिस कंपनीनं आमच्या फर्मकडे हे काम सोपवलं. त्यानंतर ही जबाबदारी आपसूकच माझ्याकडे आली. गेल्या १० दिवसांत आम्ही अत्यंत काळजीपूर्वक इमारत पाडण्यासाठी दोन्ही इमारतींवर विस्फोटकं लावली आहेत. आम्ही आता तयार आहोत”.