दिल्लीतील शिक्षणसंस्थेत ‘स्वामी चैतन्यनंद’ यांच्याकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

0
28

दि. २६ (पीसीबी)- दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च मॅनेजमेंट कॉलेजच्या 32 विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यानंदविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि छेडछाड केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी 17 विद्यार्थिनींनी लैंगिक छळाची तक्रार केली आहे. या विद्यार्थिनींनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, स्वामी त्यांना अश्लील मेसेज पाठवायचा आणि चुकीच्या कृत्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकायचा. तक्रारीनंतर हा दिल्लीचा बाबा फरार आहे. पोलिसांची अनेक पथकं त्याचा शोध घेत आहेत.

तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की,च्या पीडित विद्यार्थिनींच्या मोबाइलमधून बाबाचे अश्लील चॅट्सही सापडले आहेत. चॅट्समध्ये लिहिलं आहे की, माझ्या खोलीत ये, मी तुला परदेशी सहलीला घेऊन जाईन, तुला कोणताही खर्च करावा लागणार नाही. विद्यार्थिनींचा आरोप आहे की, जर एखादी मुलगी त्याचं ऐकत नसेल तर तो तिला परीक्षेत नापास करण्याची धमकी द्यायचा. पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, विद्यार्थिनींचे मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासासाठी पाठवले आहेत. विद्यार्थिनींनी तक्रारीत सांगितलं की, आरोपीच्या सांगण्यावरून तीन महिला त्यांच्या मोबाइलमधून चॅट्स जबरदस्तीने डिलीट करायच्या.

एवढंच नाही, होळीच्या दिवशी देखील बाबाने विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केलं. बाबाने विद्यार्थिनींना एका रांगेत उभं राहण्यासाठी सांगितलं… ओम बोलून बाबाने विद्यार्थिनींना त्याच्या समोर वाकायला लावलं… त्यानंतर भांगेत कुंकू भरलं आणि गालावर रंग लावला… याचदरम्यान एका विद्यार्थिनीने आरोप केले की, बाबा तिला बळजबरी स्पर्श करत होता आणि सतत बेबी – बेबी बोलत होता…अशी माहिती पीडित मुलींनी दिली आहे

धक्कादायक गोष्ट म्हणजे विद्यार्थिनींच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते आणि लाईव्ह फुटेज बाबा त्याच्या मोबाईलमधून बघत होता. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या 75 मुली बाबाच्या हॉस्टेलमध्ये राहतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्यांच्या प्रत्येक हलचालीवर बाबा लक्ष ठेवून आहे… हे त्या विद्यार्थिनींना माहिती देखील नव्हत.

बाबाचे काळे कृत्य समोर आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण महत्त्वाचे पुरावे हाती लागतील… यावर पोलिसांचा विश्वात आहे. बाबाचं शेवटचं लोकेशन मुंबई असल्याचं देखील पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे बाबा देश सोडून पळून जाऊ नये म्हणून लूकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.