मंचर, दि. ५ (पीसीबी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा गट तयार केला. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांना साथ दिली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मंचर (ता.आंबेगाव) येथे (ता.२१) रोजी जाहीर सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या निवडणूक प्रचाराचे रनशिंग फुंकले जाणार असल्याची व शरद पवार व त्यांचे सहकारी काय बोलणार? या विषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघ हा वळसे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यांनी या मतदार संघातून सलग सातवेळा वाढत्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. पवार साहेब व वळसे पाटील यांचे एकेमकांवर असलेले जीवापाड प्रेम सर्वश्रुत आहे.
सात महिन्यापूर्वी झालेल्या राजकीय भुकंपानंतर वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्याबरोबर राज्यसरकारमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.अनाहूतपणे त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शरद पवार व त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी वळसे पाटील यांच्याबरोबरच राहणे पसंत केले पण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदापाठोपाठ मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम नाराज होते.
राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर त्यांना आपोआपच जेष्ठ नेते पवार साहेब यांच्या गटात काम करण्याची संधी चालून आली. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष पद बहाल करण्यात आले आहे.त्यांनीही जोरदार संपर्क मोहीम हाती घेतली आहे.
जेष्ठ नेते पवार साहेब यांनी राज्यात राजकीय सभा सुरु केल्या त्यावेळीच आंबेगाव तालुक्यात पहिली सभा घेण्याचे जाहीर झाले होते पण आंबेगावला न होता ती सभा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदार संघात झाली.
आंबेगावच्या सभेचा कार्यक्रम लांबणीवर पडला. दरम्यानच्या काळात वळसे पाटील यांच्यावर शरद पवार गटातील काही नेत्यांनी वेळोवेळी टीकाही केली. पण पवार साहेबांनी मात्र अद्याप तरी वळसे पाटील यांच्यावर कोणतीही टोकाची टीका केलेली नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी व रयत शिक्षण संस्थेच्या अनेक बैठकांना वळसे पाटील व पवार साहेबांचे झालेले हितगुज दुर्लक्षित करून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर मंचर येथे होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मंचर येथे होणाऱ्या सभेची तयारी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे व देवदत्त निकम यांनी सुरू केली आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांनाही सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.