दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर करत महिलांची जिंकली मने, लावणी महोत्सवास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0
266

पिंपरी,दि. २५ (पीसीबी) – शिट्ट्या, टाळ्या अन् जल्लोषपूर्ण खड्या आवाजाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुमदुमून गेले. ‘या रावजी, बसा भावजी’, ‘इचार काय हाय तुमचा’ यांसारख्या रंगतदार लावण्या ढोलकीच्या तालावर रंगमंचावर एका पाठोपाठ सादर करण्यात आल्या. लावणी नर्तीकांनी दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर करत महिलांची मने जिंकली. या लावण्याना महिलांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने वातावरणात रंगत भरली. शिट्ट्या टाळ्यांसोबत लावणी अदाकाराबरोबर सेल्फी घेण्याचा मोह देखील महिलांना आवरता आला नाही. निमित्त होते लावणी महोत्सवाचे…!

लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी, पारंपारिक लावणी जपण्यासाठी आमदार उमा खापरे आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय लावणी महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक डॉ. पं.नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराजाची पूजा करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. लावणीसम्राज्ञी आणि परीक्षक सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यांच्यासह खापरे, उबाळे यांच्यासह माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, शैला मोळक आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी स्मृती चिन्हांचे अनावरण करण्यात आले. महिलांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरले होते.

लावणी महोत्सवाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. ‘मी राजसा तुम्हासाठी’ या संघाने पहिल्या लावणीचे सादरीकरण केले. लांवण्यांवतींनी पारंपरिक लावण्या सादर केल्या, अदाकारी सादर केल्या. नखशिखांत सजलेल्या नृत्यगंनांनी लावण्या सादर करत महिलांची मने जिंकली. रजनी पाटील पुणेकर, सोनाली जळगावकर यांनी ‘राजसा जगडी बसा, जीव हा पिसा’, ‘खेळताना रंग बाई होळीचा, काट लागे कोना माझा चोळीचा’,

दीप्ती आहेर यांनी ‘इचार काय हाय तुमचा, पाहुणे विचार काय हाय’ ही लावणी सादर केली. महिलांच्या मागणीनुसार ही लावणी ‘वन्समोअर’ झाली. महिलांचा प्रतिसाद पाहता आहेर यांनी मंचावरुन खाली उतरत महिलांमध्ये येऊन नृत्य सादर केले. परीक्षक सुरेखा पुणेकर यांनीही नृत्य केले. श्रृती मुंबईकर यांनी ‘आशिक माशुक’, उर्मिला मुंबईकर यांनी ‘कारभारी जरा दमान’ ही लावणी सादर करत दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर केले. जय मल्हार कला नाट्य मंडळाच्या संघानेही विविध लावण्या सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा चव्हाण आणि नरेंद्र आंबे यांनी केले.

महिलांनी नृत्याचा लुटला मनमुराद आनंद

लावणी महोत्सवात पारंपारिक पद्धतीने लावण्यांचे सादरीकरण झाले. नखशिखांत वेशभूषेत एकापेक्षा एक सरस लावण्यांचे सादरीकरण झाले. महिलांनी जागेवर उभे राहून लावण्यांना दाद दिली. नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. टाळ्या, शिट्या वाजविल्या. पारंपारिक वेशभूषेत, नववारी, फेटे परिधान करुन महिला आल्या होत्या. सर्वसामान्य, घरंदाज महिलांनीही लावण्यांचा मनमुराद आनंद लुटला. काही लावण्यांचा ‘वन्समोअर’ही झाला. लावणी महोत्सवाला महिलांचा तुफान प्रतिसाद मिळाला. सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. महिलांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते.

लावणीची देशभरात सर्वांना भुरळ

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच राज्यस्तरीय असा अतिशय सुंदर लावणी महोत्सव आयोजित केल्याचा आनंद आहे. आजच्या युगात पारंपरिक लावणी लोप पावत चालली आहे. महाराष्ट्रात लावणी कला अतिशय महत्वाची कला आहे. आजच्या काळात लावणीचे रूप बदलत चालले आहे. त्यासाठी पारंपारिक लावणी जपणे खूप महत्वाचे आहे. लावणीची महाराष्ट्र नव्हे तर देशभरात सर्वांना भुरळ असल्याचे डॉ. नंदकिशोर कपोते म्हणाले. तर, महिलांना काही तरी वेगळे द्यावे यासाठी, लावणीची लोककला जपण्यासाठी आणि पारंपारिक लावणी जतन करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला. यातून महिलांना चांगली मेजवानी पाहायला मिळली असल्याचे आमदार उमा खापरे म्हणाल्या