दि. 6 (पीसीबी) – दिघी-आळंदी रोडवर गुन्हे शाखेने एका व्हिडीओ गेम पार्लरवर छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख ४८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ४) सायंकाळी रॉयल व्हिडीओ गेम पार्लर येथे करण्यात आली.
सुशील सूर्यकांत आवटे (वय २९), विजय दामोदर बरगट (वय ४०), ज्ञानेश्वर मारुती साळुंके (वय ३८) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समीर काळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी-आळंदी रोडवर रॉयल व्हिडीओ गेम पार्लर मध्ये गेमच्या मशीनवरील आकड्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत एक लाख ४८ हजार ८५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.