दारू प्यायला पैसे न दिल्याने वाहनांची तोडफोड

0
715

पिंपरी, दि. १४ जुलै (पीसीबी) – दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणाला दगडाने मारण्याचा प्रयत्न करत वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री अकरा वाजताच्या सुमारास विघ्नहर्ता मित्र मंडळ चौक, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी इमरान इमाम शेख (वय 23, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश शंकर लष्करे (वय 25), अंगद बळीराम कांबळे (वय 38), शाहरुख नईम शेख (वय 26), दिनेश गोरख माने (वय 29) आणि अन्य एकजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या गॅलरीमध्ये उभे असताना आरोपींनी त्यांना आवाज देऊन खाली बोलावले. फिर्यादी यांच्याकडे आरोपींनी दारूच्या पार्टीसाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास गाडी फोडण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी यांच्या खिशातून 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्या कारवर दगडाने कोच पाडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले. त्यांना मारण्यासाठी दगड भिरकावला. मात्र फिर्यादी यांनी तो चुकवला असता दुसऱ्या वाहनाला लागून त्याचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.