दारू पिताना झालेल्या वादातून मित्रावर कोयत्याने वार; बिअरच्या बाटलीने भोकसले

0
1446

भोसरी, दि. २४ जुलै (पीसीबी) – दारू पिताना झालेल्या वादातून सहा जणांनी एका मित्रावर कोयत्याने वार केले. बिअरच्या बाटलीने भोकसून तसेच काटा चमचाने वार करत मित्राला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 22) रात्री धावडेवस्ती भोसरी येथे घडली.

आकाश संजय ठोंबरे (वय 20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश कृष्णा गवारे (वय 19, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि त्याच्या पाच अल्पवयीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक रवी भवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश आणि त्याचे पाच साथीदार धावडेवस्ती येथील एका हॉटेल समोर दारू पीत बसले होते. दारू पिताना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांचा फिर्यादी यांच्या मित्रासोबत वाद झाला. त्यातून फिर्यादी यांच्या अल्पवयीन मित्रावर कोयत्याने डोक्यात, छातीवर वार केले.

तीन मुलांनी फिर्यादी यांच्या जखमी मित्राला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चौथ्याने बिअरची बाटली फोडून जखमीच्या पाठीत भोकसली. अन्य एका मुलाने काटा चमचाने जखमी मुलावर आणखी वार केले. त्यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.