दारू पिण्यासाठी पैसे मागत भाजी विक्रेत्यास दमदाटी

0
214

 पिंपरी  दि. २१(पीसीबी) :दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत दोघांनी भाजी विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी केली. तसेच गल्ल्यातील पाचशे रुपये काढून जबरदस्तीने नेले. ही घटना रविवारी (दि. 19) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पिंपरी भाजी मंडई येथे घडली.

अण्णा रामा आडागळे (वय 40, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्ष अमर बहोत उर्फ लड्या (वय 18, रा. सॅनिटरी चाळ पिंपरी) आणि त्याचा अल्पवयीन साथिदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाजीविक्रेता असून ते रविवारी सायंकाळी त्यांच्या पत्नीसह पिंपरी भाजी मार्केट येथे भाजी विक्री करीत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र त्यांना देण्यासाठी पैसे नसल्याचे फिर्यादी यांनी सांगितले असता आरोपी हर्ष याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्याच्या अल्पवयीन साथीदाराने फिर्यादी यांना घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले असता हात पाय तोडून टाकेल अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.