दारूचे पैसे मागितल्याने दुकानदारावर कोयत्याने हल्ला

0
258

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – वाईन शॉप मधून दारू खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून दुकानदारावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 4) दुपारी पूजा वाईन्स अहिंसा चौक चिंचवड येथे घडली.

गिरीश मनोहरलाल दासानी (वय 32, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोन्या उर्फ प्रशांत आव्हाड (रा. आनंदनगर चिंचवड) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पूजा वाईन्स नावाचे दुकान अहिंसा चौकात आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानातून दारू खरेदी केली. त्याचे पैसे मागितल्याने आरोपींनी फिर्यादी सोबत हुज्जत घालून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कोयत्याने फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी यांचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींना घाबरून दुकानाबाहेर मदतीसाठी धावत असताना आरोपींनी दुकानाबाहेर पडलेले सिमेंटचे गट्टू फिर्यादीच्या दिशेने भिरकावले. यामध्ये दुकानाच्या काउंटरचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.