दारु पिताना झालेल्या वादात स्क्रू ड्राइव्हरने भोकसून तरुणाचा खून

0
87

चिंचवड, दि. 08 (पीसीबी) : दारु पिताना झालेल्या वादात स्क्रू ड्राईव्हर भोकसून तरुणाचा खून केला. चिंचवड येथे रविवारी (दि. 6) रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. चिंचवड पोलिसांनी 12 तासांच्या आत संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

अमीर मकबूल खान (34, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे खून झालेल्याचे नाव आहे. दौलत मकबूल खान (31) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यशवंत आत्माराम बगाडे (42, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर खान हा रविवारी रात्री चिंचवड येथील जकात नाक्याकडून रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या देशी दारुच्या दुकानात गेला. तेथे दारु विकत घेतली. त्यावेळी त्याच्या शेजारी यशवंत बगाडे हा दारु पीत थांबलेला होता. यशवंत याने त्याचा दारुचा ग्लास तेथील तिऱ्हाईत व्यक्तीला प्यायला दिला. तिऱ्हाईत व्यक्तीस दारुचा उष्टा ग्लास प्यायला दिल्यामुळे अमीर खान याला राग आला. त्यातून त्याने यशवंत याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर देशी दारु दुकानाच्या बाहेर देखील त्यांच्यात हाणामारी झाली. यात अमीर याने यशवंत याला वीट फेकून मारली. त्यामुळे यशवंत याने त्याच्याकडील स्क्रूड्रायव्हर अमीर याच्या छातीत खूपसला. यात अमीर याचा मृत्यू झाला.

खून प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचवड पोलिसांच्या दोन पथकांनी चिंचवडेनगर आणि दळवीनगर भागात संशयित यशवंत बगाडे याचा शोध घेतला. 12 तासांच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, उपनिरीक्षक राम जाधव, अजित दुधे, पोलीस अंमलदार धर्मनाथ तोडकर, उमेश मोहीते, उमेश वानखेडे, रोहीत पिंजरकर, पंकज बदाने, अमोल माने, रहीम शेख, प्रितम फरांदे, जगदीश भामरे, भाग्यश्री जमदाडे, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली.