दापोली-मंडणगड सह रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ नगरसेवक शिंदे गटात सामिल..

0
225

– शिवसेनेतील गळती थांबता थांबेना

रत्नागिरी, दि. १६ (पीसीबी) : जिल्ह्यातील दापोली व मंडणगड येथील एकूण ११ नगरसेवकांनी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतली. तर रत्नागिरी नगरपरिषदेच्या तब्बल वीस नगरसेवकांनी आमदार उदय सामंत यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐकूण ३१ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा व्यक्त केल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुका झाल्या. पालकमंत्री अनिल परब यांनी थेट शिवसेना राष्ट्रवादी आघाडी घोषित केली. मात्र ही आघाडी अनेक शिवसैनिकांना मान्य नव्हती, याच वेळी आमदार योगेश कदम यांनाही या सगळ्यापासून दूर ठेवण्यात आले होते. ही आघाडी मान्य नसलेल्या शिवसैनिकांनी बंड पुकारत मंडणगड येथे शहर विकास आघाडी तर दापोलीत शिवसेवा आघाडी स्थापन केली. यात मंडणगड येथे मोठं यश मिळालं, तर दापोलीत दोन जागा शिवसेवा आघाडीच्या निवडून आल्या.
शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी योगेश कदम यांची भेट घेऊन पालकमंत्री अनिल परब यांच्याबद्दल आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. चिपळूण येथील पक्षाच्या बैठकीतही आपली उघड नाराजी व्यक्त करत आपल्याला देण्यात येत असलेल्या वागणुकीचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला होता. आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेल्या मंडणगड शहर विकास आघाडीने तब्बल आठ जागांवर विजय मिळवला. तर दापोली येथे शिवसेवा आघाडीच्या दोन अपक्ष नगरसेवकांना पाठिंबा मिळाला पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून दापोलीत फार मोठा काही फायदा न होता एक जागा गमवावी लागली होती.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आताच्या राजकीय घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जातात. नगरसेवकांमध्ये दापोलीतील शिवसेनेच्या सगळ्यात तरूण नगरसेविका शिवानी खानविलकर, अपक्ष नगरविकास कृपा घाग, सौ. शिर्के उपस्थित होत्या. तर मंडणगड येथील विनोद जाधव शिवसेना शहर प्रमुख गटनेता, सेजल गोवले शिवसेना शहर संघटिका व नगरसेविका, नगरसेवक मुश्ताक, योगेश जाधव, निलेश सापटे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, प्रवीण जाधव स्वीकृत नगरसेवक,आदेश मर्चंडे आरपीआय (आठवले गट), मंडणगड शहर विकास आघाडी स्थापन करून आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. यावेळी सोबत उपशहर प्रमुख निलेश गोवळे, नरेश बैकर हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोली व मंडणगड येथील विकासकामांना आमदार योगेश कदम यांच्या मागणीनुसार आपल्या माध्यमातून निधी दिला जाईल अशी ग्वाही दिली.