दापोडी व गवळी माथा शून्य कचरा प्रकल्पाची यशस्वी वाटचाल

0
5

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी करून घेतला आढावा

शहरातील इतर झोपडपट्ट्यांमध्येही शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे दिले निर्देश

दि.०१(पीसीबी)- दापोडी व गवळी माथा परिसरात राबविण्यात येत असलेल्या ‘शून्य कचरा’ प्रकल्पाचा आढावा घेताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध उपक्रमांची सखोल पाहणी केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.

प्रकल्पस्थळी कार्यरत बचतगटातील महिलांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी आयुक्त म्हणाले की, दापोडी व गवळी माथा येथील शून्य कचरा प्रकल्प हा पर्यावरणपूरक आणि शाश्वत नागरी स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

घरगुती कचऱ्याचे संकलन करून त्याचे ओला व सुका असे वर्गीकरण, तसेच त्यापासून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात आहे. या प्रक्रियेत काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असून, आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी नमूद केले.

स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, दापोडी व गवळी माथा येथील शून्य कचरा प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीचा आदर्श घेऊन, शहरातील इतर झोपडपट्टी भागांमध्येही अशाच प्रकारचे प्रकल्प राबविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यामुळे संपूर्ण शहरात शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा विस्तार होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या पाहणीदरम्यान उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली.

शाश्वत कचरा व्यवस्थापनाकडे ठाम पाऊल :
दापोडी व गवळी माथा परिसरातील ‘शून्य कचरा’ प्रकल्प शहरासाठी एक आदर्श मॉडेल ठरत असून, पर्यावरण संवर्धनासह स्वच्छतेच्या दृष्टीने मोठे योगदान देत आहे. भविष्यात अशा प्रकल्पांची संख्या वाढवून पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याबाबत यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे, सहा. आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, पूजा दुधनाळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, योगेश फल्ले, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, वैभव घोळवे, सतीश इंगेडवाड, दीपक कोटियाना, आरोग्य निरीक्षक सचिन जाधव तसेच, सीवायडीए संस्थेचे कार्यकारी संचालक प्रविण जाधव, प्रकल्प व्यवस्थापक आशिष इंगोले, प्रकल्प अधिकार किशोर काळे तसेच, सुमित चंदनशिवे,नवनाथ ढेंबरे, ऋषिकेश चौधरी यांच्याबरोबर अन्य महापालिका अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

असा आहे शून्य कचरा प्रकल्प :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सीवायडीए संस्था आणि अकर सोल्युशन यांच्या सहकार्याने दापोडीतील आनंदवन व काटेवस्ती येथे ‘शून्य कचरा’ प्रकल्प सुरू केला आहे. वैष्णवी महिला बचत गटामार्फत हा प्रकल्प यशस्वीपणे चालवला जात असून, गवळी माथा येथे श्रीकृष्ण महिला बचत गटाकडून प्रकल्प चालविण्यात येत आहे.

दापोडीतील दररोज ४२८ घरांमधील कचऱ्याचे संकलन करून त्याचे ओला व सुका असे वर्गीकरण केले जाते. त्यानंतर धूळ झटकण्याची मशीन, ॲग्लोमीटर, हायड्रॉलिक प्रेस तसेच सेमी-ऑटोमॅटिक खतनिर्मिती यंत्रांच्या सहाय्याने कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाते.