दापोडीत आल्‍याने तरुणावर धारदार शस्‍त्राने वार

0
69

दापोडी, दि. १५ (प्रतिनिधी)

येऊ नकोस असे सांगूनही तू दापोडीत का आला, असे म्‍हणत एका तरुणावर धारदार शस्‍त्राने वार करण्‍यात आले. ही घटना बुधवारी (दि. १३) दुपारी तीन वाजताच्‍या सुमारास दापोडीतील आई गार्डन ते सांगवीकडे जाणार्‍या रस्‍त्‍यावर घडली.

आनंद वसंत कांबळे (वय ३१, रा. अविनाश अपार्टमेंट, संगम नगर, जुनी सांगवी) असे जखमी झालेल्‍या तरणाचे नाव असून त्‍यांनी गुरुवारी (दि. १४) याबाबत दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोसीन बाबु सय्यद (वय ३०, रा. जयभीम नगर, पाटील गिरणी जवळ, दापोडी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे व त्यांचा मित्र सनी मुदलीयार हे दोघेजण आई गार्डनकडून सांगवीकडे पायी जात असताना आरोपी मोसीन हा तिथे आला. तो कांबळे यांना म्‍हणाला की, तुला काय सांगितले होते की, दापोडीत यायचे नाही. तरी तू का आलास, असे म्‍हणत शिवीगाळ केली. आपण मित्राला भेटायला आल्‍याचे फिर्यादी कांबळे यांनी सांगितले. दापोंडी सर्वांची आहे असे बोलल्यावर आरोपीस राग आला. त्‍याने शिवीगाळ करत कांबळे याच्‍या कानाखाली मारली. तसेच धारदार हत्याराने फिर्यादी यांच्‍या मानेवर दोनवेळा वार करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र सावध असलेल्‍या फिर्यादी यांनी तो वार हुकविला. मात्र धारदार हत्‍यार फिर्यादी यांच्‍या मनगटावर लागुन गंभीर दुखापत झाली.आरडाओरडा एकून नागरिक जमा होऊ लागले. त्‍यावेळी आरोपी मोसीन याने नागरिकांनाही धमकावले. त्‍यावेळी कोणीतरी पोलीस आल्‍याचे म्‍हटल्‍याने आरोपीने तेथेच कुठेतरी गवतात त्याचे धारदार हत्‍यार टाकून पळून गेला.