दादा समर्थक असल्याने गुन्हा दाखल होऊनही अटकेला मुहूर्त नाही

0
9

पुणे, दि. २७ (पीसीबी)  : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू आणि पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या दिवसाढवळ्या मोगलाईचा व्हिडिओ व्हायरल झाला असतानाच आता आणखी काही लोकांना दमदाटी करतानाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. चांदेरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बांधकाम व्यवसायिकाला रस्त्यावर उचलून आदळत अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पहिल्यांदा टाळाटाळ झाली होती. मात्र, आता गुन्हा नोंद झाल्यावर देखील चांदेरेंना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे राजकीय वरदहस्त असल्याने चांदोरे मोकाट आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय आहे प्रकरण?
बाबुराव चांदेरे यांनी दोन दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केली होती. मारहाणीला दोन दिवस होऊनही पुणे पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यानंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून मनपा निवडणूक होत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मध्यस्थीने बाबुराव चांदेरे यांनी 50 कोटींचा निधी आपल्या प्रभागात आणला होता. या कामासाठी ठेकेदारही त्यांच्याच मर्जीत नेमण्यात आला होता. यामधील एक ठेकेदार होता त्याच्याकडे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम देण्यात आले होते. संबंधित ड्रेनेज लाईन बिल्डरच्या जागेतून जात होती, त्याच्यातून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काम थांबलं तर ठेकेदाराला त्रास होईल म्हणून मारहाण करण्यात आली होती. यापूर्वी सुद्धा बाबुराव चांदेरे यांचे अनेक व्हिडिओ मारहाणीचे व्हायरल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबूराव चांदेरे प्रकरणाची दखल
दरम्यान, दिवसाढवळ्या मोगलाईची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबूराव चांदेरे प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव वापरून कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे. बाबुराव चांदेरे यांच्या याआधी देखील पक्षाकडे मारहाण आणि दहशत निर्माण करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कबड्डी असोसिएशनमधील मनमानी कारभाराचा देखील पक्षाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. प्रदेश पातळीवरून पुणे प्रकरणाची माहिती घेऊन त्यांच्यावर लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातील वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला ही माहिती दिली आहे.