दादा भुसे हेच ड्रग माफिया ललित पाटीलला मातोश्रीवर घेऊन आले होते

0
359

पुणे, दि. ११ (पीसीबी) – पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवणारा ड्रगमाफिया ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. गेल्या आठ दिवसांपासून ललित पाटील बेपत्ता आहे, पण आता या घटनेत राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री दादा भुसे यांच्याकडे बोट दाखवले जात आहे.

ललित पाटील याचे मातोश्रीवरील फोटो व्हायरल झाले आहेत, पण दादा भुसे हेच ललित पाटीलला मातोश्रीवर घेऊन आले होते. शिंदे गटाचे आमदार आणि विद्यामन मंत्री दादा भुसे यांनीच ललितला रुग्णालयातून पळून जाण्यात मदत केली. असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ससूनचे डीन आणि दादा भुसेंवर गंभीर आरोप केले आहेत. ‘ससून रुग्णालयाचे आधीचे आणि आताचे अधिष्ठाता (डीन) यांची चौकशी झाली पाहिजे, गोपनीयतेच्या कायद्यानुसार डॉक्टरांना काही माहिती खुली करता येत नाही. पण ललित पाटीलला कोणता आजार होता, गेल्या नऊ महिन्यांपासून त्याच्यावर कोणते उपचार सुरू होते, कोणत्या डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार झाले, त्याला कोणता आजार होता, याचे तर डीन नक्कीच सांगू शकतात, त्यामुळे त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं.’

जर डीन हे सर्व सांगू शकत नसतील, नऊ महिन्यांपासून ससूनसारख्या ठिकाणावरून जर ड्रग्ज रॅकेट चालू होतं, ही बाब गंभीर आहे. यावर गृहमंत्र्यांनी बोललं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी दादा भुसेंवरही आरोप केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनीही या प्रकरणात शिंदे गटाच्या आमदाराचे नाव घ्यावे, नाशिकशी संबंधित गोष्ट आहे, असे आम्ही सांगत आहोत. दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा, यात इतके लागण्यासारखे काय आहे, असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी उपस्थित केला