दादागिरी खपवून घेणार नाही! स्पाईन रोडवरील 22KV केबल प्रकरणातील नियमभंगावर सीमा ताई सावळेंचा ठाम इशारा

0
16

दि.१३(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड शहरातील स्पाईन रोड चौक परिसरात महावितरण अर्थात MSEB च्या कंत्राटदारामार्फत सुरू असलेल्या 22KV वीज केबलच्या खोदकामात सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांच्या जीविताला थेट धोका निर्माण झाला असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा व माजी नगरसेविका सीमा ताई सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली आणि सुरू असलेल्या कामावर जोरदार आक्षेप नोंदवला.

नियमांनुसार 22KV क्षमतेची वीज केबल किमान 5 फूट जमिनीखाली टाकणे बंधनकारक आहे, जेणेकरून भविष्यात रस्ता खोदकाम, पावसाळ्यातील धूप किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे वीज अपघात होऊ नयेत. मात्र प्रत्यक्षात ही केबल केवळ 1 ते 1.5 फूट खोलीवरच टाकली जात असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, भविष्यात किरकोळ खोदकामामुळेही केबल उघडी पडून मोठा अपघात, विद्युत धक्का किंवा मानवी जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही.

या धोकादायक कामाबाबत स्थानिक नागरिकांनी आणि परिसरातील व्यावसायिकांनी आक्षेप घेतला असता, संबंधित कंत्राटदाराकडून दादागिरी, उर्मट भाषा आणि धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे. सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या नागरिकांना गप्प बसवण्याचा आणि दबावाखाली आणण्याचा प्रयत्न होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र परिस्थितीची माहिती मिळताच सीमा ताई सावळे यांनी घटनास्थळी पोहोचून कंत्राटदाराला जाहीरपणे खडसावले आणि हुकूमशाही व दादागिरी सहन केली जाणार नाही, असा ठाम आणि स्पष्ट इशारा दिला.

यावेळी बोलताना सीमा ताई सावळे म्हणाल्या की, थोडे पैसे वाचवण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोणत्याही कंत्राटदाराला किंवा अधिकाऱ्याला माफ केले जाणार नाही. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सीमा ताई सावळे यांनी प्रशासनाला या संपूर्ण कामाची तात्काळ चौकशी करून नियमानुसारच केबल टाकण्याचे आदेश देण्याच्या सूचना केल्या. तसेच, सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड झाली तर नागरिकांच्या पातळीवर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या गंभीर प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आता महावितरण आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, दोषींवर कठोर कारवाई होते की नाही, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.