दादांच्या राष्ट्रवादी कार्यालया समोर साहेबांच्या राष्ट्रवादीचे भव्य कार्यालय, शनिवारी उद्घाटन

0
388

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका विचारात घेऊन शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड शहरात जोरदार तयारी सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन तसेच पदाधिकारी नियुक्ती सोहळा व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे.

शनिवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य अशा नवीन कार्यालयाचे उद्धाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात सनशाईन मार्क्स बिल्डिंगमध्ये तब्बल दोन हजार चौरस फुटाचे भव्य कार्यालय थाटले आहे. विशेष म्हणजे खराळवाडी येथे जुन्या मुंबई पुणे रस्त्याच्या समोरच्या बाजुलाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यालय आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष तुषार गजानन कामठे यांनी केले आहे.