दादांचा अपघात घातपात असण्याची शक्यता

0
3

मुंबई, दि. १० : अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली.

विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले. दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावाच, पण त्याचसोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेनेही करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली.

मोसादचा दाखला
अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्त्रायची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला. अशी कामं करण्यामध्ये इस्त्रायलचा एक एजंट कुशल होता. एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा असं तो म्हणायचा. अजितदादांच्या अपघातासंबंधी असाच काही प्रकार घडलाय का याचा तपास व्हावा अशी मागणी रोहित पवारांनी केली.

विदर्भातील नेत्याच्या फाईलमुळे दादांना उशीर
रोहित पवार यांनी दावा केला की, “पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे.

ही घटना घडली आहे. मलाही असं वाटत होतं की अशी घटना व्हायला नको होती, पण ते सत्य आहे. अजितदादांचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी त्यांचं स्वेटर आणि चपला सापडल्या. अजितदादा जे घड्याळ घालायचे ते 15 मिनिटे पुढे लावून ठेवायचे. ते घड्याळ त्या ठिकाणी सापडलं. त्यामुळे सगळ्यांनी आता वस्तुस्थिती स्वीकारावी.

अपघाताचा घटनाक्रम काय?
दादांना 210 किमी प्रवास करायचा होता. त्यासाठी त्यांना 27 मिनिटे लागणार होती. दादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते लेअरजेट विमान होतं. हे विमान ज्या कंपनीचं होतं त्याचं नाव व्हीएसआर असं आहे. विजय कुमार आणि रोहित सिंह असे दोन डायरेक्टर आहेत. तर या कंपनीचे 27 स्टेक होल्डर्स आहेत.

अजितदादा हे 7 वाजून 50 मिनिटांनी एअरपोर्टवर आले. दादांचे विमान 8 वाजून 10 मिनिटांनी टेक ऑफ केलं. 8.22 वाजता ते विमान हे लोणावळाजवळ असेल. 8.43 ते 8.45 दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. 9 वाजता दादा गंभीर असल्याची माहिती आली आणि 9.45 वाजता दादांचं निधन झाल्याची बातमी आली.

हे विमान 16 वर्षांपूर्वीचं विमान होतं. त्याच्या आधी दोन दिवस हे विमान सुरतला जाऊन आलं होतं. विमान चांगल्या स्थितीत होतं आणि वैमानिक अनुभवी होते, पण अपघात धुक्यामुळे झाल्याची शक्यता असल्याचा दावा या विमान कंपनीच्या मालकाने केला. परंतु ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी चित्र वेगळंच दिसतंय. विमान खाली येताना ते कलल्याचं समोर आलं आणि नंतर त्याचा स्फोट झाला हे स्पष्ट झालं.

रोहित पवारांचे पाच महत्वाचे प्रश्न

  1. विमानात काय बिघाड झाला होता त्यामुळे ते एका बाजूला कललं?
  2. त्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का? मेकॅनिकल फेल्युअर झालं असावं काय?
  3. टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाचे पाहणी झाली होती का? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे?
  4. विमानाचा रूटिन मेंटेनन्स झालं नव्हतं का? ते कुणी केलं होतं? विमानाचा हँगर सीसीटीव्ही कुठे आहे?
  5. विमानाचा हेव्ही मेंटेनन्स कधी झाला होता? त्याचा अहवाल कुठे आहे?

आतापर्यंत 13-14 दिवसात काहीही तपास झाला नाही. याचा फक्त सीसीटीव्ही गोळा केला, पण त्यावर काहीही झालं नाही. त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काहीही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे. बारामतीत ILS सिस्टिम नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय.

या आधी याच कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्यावर काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपूर्वी त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का? तसं जर झालं नसतं तर आज अजितदादांचा अपघात झालाच नसता हे नक्की.
या व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही.

VSR कंपनीसंबंधी पुढे आलेल्या बाबी
वैमानिकाच्या उड्डाणामध्ये 12 तासांच्या फरक असला पाहिजे. पण सहा तासांच्या उड्डाणानंतरही वैमानिकांना विमान उड्डाण करण्यास दबाव येत होता. या कंपनीत कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर बंद असतं. चेकलिस्ट पद्धत कंपनीमध्ये नाही. या कंपनीचे स्वतची स्टँडर्ड पद्धत नाही.

पायलटने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही?
दादांच्या विमानाने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणे महत्त्वाचं होतं का?
हे विमान पुढे वाराणसीला जाणार होतं. त्याचं भाडं बुडू नये म्हणून घाईगडबड केली का याची चौकशी झाली पाहिजे.
विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती. त्यामुळे आधीच काही गोष्टी समजल्या नाहीत. याच कारणामुळे हा अपघात घडल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं, मग तिथे EGPWS इशारा दिला होता की नाही? त्याचा अलर्टचा आवाज का आला नाही?
कंपनीला हेव्ही बेस मेंटेनन्स करता येत नव्हतं का? तसा अहवाल कुणी दिला?
या प्रकरणी क्लिअरर इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर आणि मेंटेनन्स इंजिनिअरवर कारवाई केली पाहिजे.

या अपघातासंबंधी उपस्थित काही गंभीर प्रश्न

  • खर्च वाचावा म्हणून VSR कंपनी बऱ्याचदा अतिरिक्त इंधन न्यायचे अशी खात्रीलायक माहिती आहे. असे पेट्रोल जर विमानात ठेवण्यात येत असेल तर ते विमानासाठी बॉम्बच असू शकेल.
  • या कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा अशी आमची मागणी आहे.
  • हा अपघात होऊनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री याच कंपनीच्या विमानातून प्रवास करतात. त्यामुळे ते अधिक गंभीर आहे.