दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार आणि खून

0
172

कोल्हापूर, दि. २२ –
बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी अशा घटना समोर येत आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे आले असताना एका दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार होऊन तिचा खून झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोल्हापूर येथील शिये गावात सदर घटना घडली असल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बिहारमधून पीडित मुलीचे कुटुंबीय कोल्हापूरात आले होते. काल दुपारी पीडितेच्या काकांनी तिला मारल्यामुळे ती घरातून बाहेर पडली होती. रात्री १० वाजता ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी रात्री शोध घेतल्यानंतर सकाळी तिचा मृतदेह सापडला. पीडितेवर लैंगिक अत्याचार झालेला असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असून काही संशयितांना पकडले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत या घटनेच्या तळाशी जाऊन आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल. तसेच पीडित बिहारच्या कुटुबीयांनाही मदत दिली जाईल.”

विरोधकांकडून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र
राज्यभरात महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना घडत असतान सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम होत आहेत, असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही लाडक्या बहि‍णींना आधार देण्याचा कार्यक्रम घेत आहोत. पण विरोधकांना ही योजनाच रुचलेली नाही. त्यामुळे या योजनेला कसा खोडा घालायचा. याबद्दल त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. बदलापूर येथे आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिली असता स्वंयस्फुर्तीने सुरू झालेल्या आंदोलनात माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर आले कुठून? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आमच्या योजनेला बदनाम करण्यासाठी सात-आठ तास रेल्वे रोको करणे योग्य आहे का? मी दोन महिन्यात बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असे म्हणालो होतो. त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मी आज त्या खटल्याची माहिती दिली असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.