दहा दिवसांत ३४ लाख ८८ हजार भाविकांचा मेट्रोतून प्रवास

0
3


दि.८(पीसीबी)-यंदा देखावे पाहण्यासाठी येणाºया भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे प्रवाशांचा नवा उच्चांक गाठला. पुणे शहरातील अनेक रस्ते विसर्जन मिरवणुकीनिमित्त बंद असतात. मात्र, देखावे आणि मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांचा पुणे मेट्रोला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शनिवारी (दि. ६) रोजी २४ तासांत तब्बल ५ लाख ९० हजार ९४४ जणांनी मेट्रोतून प्रवास केला. तर मागील दहा दिवसांच्या काळात ३४ लाख ८८ हजार भाविकांनी मेट्रोतून प्रवास केला. यापोटी मेट्रोला ५ कोटी २८ लाख ८६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

गेल्या वर्षी गणपती विसर्जनादिवशी उच्चांकी ३ लाख ४६ हजार प्रवाशांनी मेट्रोकडून प्रवास केला होता. यंदा ५ लाख ९० हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. गेल्या वषीर्पेक्षा यंदा २ लाख ४५ हजार प्रवाशांची संख्या वाढली आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी येणाºया भाविकांची संख्या वाढली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना झाला आहे.

मेट्रोमुळे प्रवासी वाहतूककोंडीतून मुक्त झाले असून देखावे पाहणे सोयीचे झाले आहे. तर विसर्जन मिरवणूक दिवशी सगळ्यात जास्त भाविकांनी मेट्रोचा आनंद घेतला. सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू आहे. त्यामुळे भाविकांना थेट मध्यवर्ती भागात मिरवणूक पाहण्यासाठी सोयीचे झाले आहे.

मंडई, डेक्कन मेट्रो स्टेशन हे प्रवाशांना, भाविकांना मध्यवर्ती भागात येण्यासाठी सोयीचे आहे. या दोन स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवारी मंडई स्थानकावरून ६५ हजार ५४२ आणि डेक्कन स्थानकावरून ६४ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर शहराच्या मध्यवस्तीत गणपती पाहण्यासाठी मंडई मेट्रो स्टेशन असल्याने प्रवाशांकडून या मेट्रो स्टेशनचा वापर सर्वाधिक केला जात आहे. त्यादृष्टीने मेट्रो प्रशासनाकडून या स्थानकांत सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी नियोजन करण्यात आले आहे.