दहा दिवसांत जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करणार

0
308

पिंपरी,दि.२४ (पीसीबी) – लम्पी विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागामार्फत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती पशू वैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली. तसेच शहरात 8 जनावरांना लम्पीची लागण झाली असून आत्तापर्यंत 700 जनावरांचे लसीकरण झाले आहेत.

लम्पी विषाणूने राज्यासह पुणे जिल्ह्यात थैमान घातले आहे. लम्पीमुळे आत्तापर्यंत जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात गायवंशीय प्राण्यांची संख्या 3 हजार 500 आहे. आतापर्यंत 8 लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळली आहेत. सुरूवातीला लागण झालेली 5 जनावरे बरे होण्याच्या मार्गावर आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. तसेच राज्य पशू संवर्धन विभागातर्फे अडीच हजार लसीचे डोस आले आहेत. पहिल्या टप्प्यात गोशाळांमधील जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून हे लसीकरण मोफत आहे.
जनावरांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने दोन पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमध्ये 1 डॉक्‍टर, 1 पशुधन पर्यवेक्षक,1 मदतनीस असे तिघांची दोन पथके आहेत. ही पथके एका दिवसात 200 जनावरांचे लसीकरण करत आहेत. यासाठी दोन स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील पशू पालकांनी घाबरून जावू नये.

दरम्यान, शहरात शर्यतीसाठी बैल आणि दुधासाठी गोधन पाळणाऱ्यांची मोठी संख्या आहे. शहरात लम्पी आजाराचा शिरकाव होताच अनेक पशू पालकांनी, बैलगाडा मालकांनी आपल्या जनावरांचे स्वःखर्चाने लसीकरण घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाचा काही प्रमाणात ताण कमी झाला आहे.