दहा जानेवारीला आम्हाला श्रध्दांजली, मंत्री गुलाब पाटील यांच्या विधानामुळे खळबळ

0
298

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिवसेना पक्ष फूटल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पक्षाविरोधात जाऊन भाजपाबरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल द्यावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील (ठाकरे गट आणि शिंदे गट) आमदारांची धाकधुक वाढली आहे. अशातच शिंदे गटातील नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार अपात्रतेवरून सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने जळगावात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीवेळी गुलाबराव पाटील शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना म्हणाले, आता युद्धाची तयारी सुरू झाली आहे. या तयारीदरम्यान वेगवेगळ्या वावड्या उठू लागल्या आहेत. कोणी काहीही सांगतं. काहीजण विचारत आहेत तुमचं (शिंदे गट) १० जानेवारीला काय होणार? माझं त्यांना एकच उत्तर आहे. ते आमचं आम्ही बघू. आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार की, आम्ही शहीद होणार ते आम्ही बघू. तुम्ही त्याची काळजी करू नका.

गुलाबराव पाटील म्हणाले, काहीजण विचारतात की तुम्हाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळणार का? मी त्यांना एवढंच सांगेन, आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे त्यासाठी सज्ज आहेत. निवडणूक चिन्हाचं काय करायचं ते एकनाथ शिंदे ठरवतील. तुम्ही त्याची काळजी का करता? काहीजण काळजी करत आहेत आता यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. मी त्यांना सांगेन, तुम्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करा.

दरम्यान, गुलाबराव पाटील कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही एकच काळजी करायची. या मतदारसंघात आपण कसे निवडून येऊ ते बघायचं. या चर्चांकडे दुर्लक्ष करून केवळ मतदारसंघात लक्ष द्यायचं.

यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले, राजकारणातील कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत संपर्क हा अतिशय महत्वाचा असून ही राजकारण्यांची मोठी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी मंत्री असण्यापेक्षा मी कार्यकर्ता आहे. तर शाखा हा शिवसेनेचा महत्वाचा घटक असून प्रत्येक शाखेचा व विकास कामांचा फलक गावागावात लागलाच पाहिजे. त्याचबरोबर लवकरच जळगावात पक्षाचे मध्यवर्ती जिल्हा कार्यालय सुरू होणार आहे. लोकसभेसाठी जिल्ह्यात शिवसेनेसाठी पुरक वातावरण असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक काम करण्यासाठी सज्ज राहावं.