दहा कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने 31 लाखांची फसवणूक

0
67

चिंचवड, दि. 19 (प्रतिनिधी)

खाजगी फायनान्स कंपनीकडून दहा कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची 31 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्यावसायिकाने दिलेल्या धनादेशावर खाडाखोड करून त्या आधारे व्यावसायिकाच्या बँक खात्यातून पैसे काढून घेण्यात आले. तसेच व्यावसायिकाच्या एटीएम द्वारे देखील रक्कम काढून घेण्यात आली. हा प्रकार 11 जून ते 25 जुलै या कालावधीत शाहूनगर चिंचवड येथे घडला.

संतोष भोसले (वय 35), गणेश साहेबराव लांडगे, गणेश गोविंद फडके (वय 49, रा. पूर्णानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी संजय हरिभाऊ शेटे (वय 51, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश लांडगे यांनी फिर्यादी शेटे यांना ॲरेना फायनान्स कंपनीकडून दहा कोटी रुपये कर्ज देण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी कंपनीचा प्रतिनिधी संतोष भोसले याच्याशी ओळख करून दिली. शेटे यांच्याकडून 1500 रुपयांचा व 700 रुपयांचा धनादेश भोसले यांनी घेतला. त्यानंतर एका धनादेशावरील शाई खोडून त्यावर खाडाखोड करून तो धनादेश सातारा येथील आयडीबीआय बँकेमध्ये वटवून त्यावरून 21 लाख 45 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच बेयरर धनादेश देऊन त्या आधारे नऊ लाख रुपये काढून घेतले. एटीएम द्वारे 75 हजार रुपये काढून एकूण 31 लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.