दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या महापालिका शाळांमधील २३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये धनादेश वाटप…

0
117

पिंपरी, दि. ७ – आजची मुले ही उद्याच्या देशाची उज्ज्वल भविष्य आहेत, विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी तसेच समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी महापालिका शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांत मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी ते सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. येत्या शैक्षणिक वर्षात सर्वांनी योग्य समन्वयाने काम केल्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्तावाढीचा आलेख अधिकाधिक वाढेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासमवेत संवादसत्राचे आज चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थित मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधताना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपआयुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगिता बांगर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (क्यू. सी. आय.) च्या मधु अहलूवालिया यांच्यासह महापालिकेच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. विद्यार्थी नेतृत्व विकसन तसेच विद्यार्थी केंद्रित शाळा चालविण्यासाठी विद्यार्थ्यांची मते लक्षात घेऊन त्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी चालू शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शाळांमध्ये स्टुडेंट कौन्सिल ची निवड करण्यात येणार आहे. जुलै २०२४ पासून मास्टर ट्रेनर हे प्रभागानुसार क्लस्टर मिटींगचे आयोजन करणार आहेत. तसेच मुख्याध्यापकांसाठी व्यावसायिक तसेच वैयक्तिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने क्लस्टर मीटींगच्या माध्यमातून एक व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून क्युआर कोड प्रदान करण्यात येणार असून डीबीटी द्वारे शालेय साहित्य खरेदी करण्यास कोणतीही अडचण आल्यास या अडचणींचे निरसन करण्यासाठी शिक्षकांसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात येणार आहे, अशी माहितीही आयुक्त सिंह यांनी यावेळी दिली. 

सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना काळानुरूत स्वत:मध्ये सुधारणा करणे गरजेचे असते. शिक्षकांनी देखील स्वत:मधील उणिवा ओळखून त्यावर काम करणे आवश्यक आहे. महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या प्रत्येक उपक्रमाचा शिक्षक हा पाया आहे. हा पाया अधिक मजबूत करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील समन्वयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा उद्देश नक्कीच यशस्वी होईल, अशी अपेक्षाही आयुक्त सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.

महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहेत. मागील शैक्षणिक वर्षात पवित्र पोर्टलमार्फत १०६ माध्यमिक शिक्षकांची भरती करण्यात आली असून येत्या काही दिवसांत १०३ माध्यमिक शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. महापालिकेच्या ५२ प्राथमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर २६ कला शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा १३ जून ते १४ जून रोजी घेण्यात येणार आहे. तसेच ३२ प्राथमिक शाळांमध्ये ३२ क्रीडा शिक्षकांची प्रायोगिक तत्वावर नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिली.

याव्यतिरिक्त शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या अशैक्षणिक प्रशासकीय कामाचा भार कमी करण्यासाठी सर्व प्राथमिक शाळांमध्ये एका डेटा एन्ट्री ऑपरेटरची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी समर्थन आणि मार्गदर्शन करण्यासाठी २५ समुपदेशकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. वर्षभरामध्ये कोणकोणते उपक्रम राबविता येतील हे स्पष्ट करण्यासाठी वार्षिक दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शनिवारी दप्तराविना शाळा हा नाविन्यपुर्ण उपक्रमही राबविण्यात येत आहे, अशी माहितीही बांगर यांनी यावेळी दिली.
सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ३ हजार ७०० रुपये तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ३ हजार ९०० रुपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शाळा व प्रशासन यांच्यामध्ये सुलभ समन्वय राखण्याकरिता यावर्षी एकूण ११ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सध्या ९ प्रभारी पर्यवेक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर माध्यमिक शिक्षण विभागाकडील शाळा व प्रशासन यांच्यामध्ये सुलभ समन्वय राखण्याकरिता उपशिक्षणाधिकारी तसेच २ समन्वयक नेमण्यात आले आहेत.

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक थम्ब मशिन्स बसविण्यात येणार असून जुलै महिन्यापासून सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचाऱ्यांचे पगार बायोमेट्रिक हजेरीप्रमाणे करण्याचे नियोजन आहे. शालेय गरजेनुसार शैक्षणिक प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात यावेत यासाठी प्रकल्प सल्लागार समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये वैद्यकीय विभागाकडून ४० हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पुर्ण करण्यात आली आहे. यावर्षीही जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावर्षी ६८ प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याची काम हाती घेण्यात आले आहे. ज्यामध्ये ग्रीनबोर्ड, जुनी पुस्तके निर्लेखित करणे, बेंचची संख्या वाढविणे, संगणकांची संख्या वाढविणे तसेच जुने संगणक दुरूस्ती करणे अशा गोष्टींचा समावेश आहे, अशी माहितीही थोरात यांनी यावेळी दिली. तसेच शाळा व्यवस्थापन समिती मेळाव्याचा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत शाळा सुरक्षा ऑडिट आणि बाल सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये एकूण ११५ शाळांनी शाळा सुरक्षा ऑडिट यशस्वीरित्या पुर्ण केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मधु अहलुवालिया यांनी भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने शाळांची तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी महापालिका शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

दरम्यान, या २०२३-२४ शैक्षणिक वर्षात दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या २३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये धनादेश वाटप आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये रोशन मळेकर, अतुल राठोड, पवित्रा थोरवे, अंकित गिरी, शिवम सारगे, गणेश पांडे, रुपाली अहेरी, मुद्रिका सुतार, ऐश्वर्या बलदे, कोमल मौर्य, नेहा शिंदे, प्रतीक्षा कांबळे, प्रगती कांबळे, रुपाली शिंगे, श्रेया पवार, ऋतिका पाथरकर, विशाखा मोरे, सम्यक वाघमारे, प्रांजल पारवे, महेश ठोसर, सानिक चौधरी, अभिषेक साहू, शाहिस्ता सय्यद या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच यावेळी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी बालवाडी, प्राथमिक शैक्षणिक दिनदर्शिका, इंग्रजी अभ्यास पुस्तिका आणि जल्लोष शिक्षणाचा उपक्रम पुस्तिकेचे अनावरणही आयुक्त सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी उपस्थित शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाबाबत समस्या जाणून घेतल्या आणि त्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता बांगर यांनी सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी तर उपस्थितांचे आभार चारुशिला फुगे यांनी मानले.