दसऱ्याला ६,५२३ नवीन वाहने पिंपरी चिंचवड च्या रस्त्यावर

0
261

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडवासीयांनी दुचाकीखरेदीला पसंती दिली. चार हजार ७२ दुचाकी आणि दोन हजार ४५१ मोटार खरेदी केल्या आहेत. शहरात सद्या ३२ लाख वाहने धावत असताना आता या साडेसहा हजार वाहनांची भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सात हजार २७६ वाहनांची नोंदणी झाली. त्यातून ३७ कोटी ४५ लाख ५९ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मुहूर्तावर वाहन नेण्यासाठी अनेकांची पसंती असते. त्यामुळे काही दिवस आधीच वाहनांची नोंदणी केली जाते. त्यानुसार घटस्थापनेपासून दहा दिवसांत सात हजार २७६ वाहनांची नोंदणी झाली. आकडेवारीनुसार दुचाकी वाहनांची संख्या सर्वांत जास्त म्हणजेच चार हजार ७२ तर, मोटारींची संख्या दोन हजार ४५१ इतकी आहे. त्याशिवाय ४८ ट्रॅक्टर, २६६ माल वाहतूक टेम्पो, ११८ तीनचाकी, ३६ खासगी बस, २८५ इतर वाहनांची नोंदणी झाली.

दहा दिवसांमध्ये सात हजार २७६ वाहनांची नोंदणी झाली. त्यापोटी ३७ कोटी ४५ लाख रुपयांचा महसूल कार्यालयाला प्राप्त झाल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.