दसऱ्यानिमित्त कोट्यवधींची उलाढाल; सोने, वाहनांची खरेदी

0
238

पिंपरी दि. ७ (पीसीबी) – साडेतीन मुहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने बाजारात दुचाकी व चारचाकी वाहने, सोने खरेदी जोरात झाली. या निमित्ताने बाजारात करोडोची उलाढाल झाली आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात दसरा सणाची बाजारपेठ फुलली होती.

दसऱ्याच्या मुहुर्तावर खरेदी करण्यासाठी आधीपासूनच वाहन बुकींग सुरू झाली होती. गेल्या महिन्याभरात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 14 हजार 567 वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 8 हजार 448 दुचाकी, 4 हजार 456 कार, 935 टेम्पो यासह अशा विविध वाहनांचा समावेश आहे. बुकिंग करून झाल्यावर दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी वाहने शोरूममधून नेली. सर्वच वाहनांची यावर्षी खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. झिरो किंवा कमीत कमी डाउनपेंमेट, कर्ज योजना, आकर्षक इएमआय या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यावर्षी ई-व्हेईकल देखील बाजारात आल्या आहेत. वाढत्या इंधन दरवाढीमुळे ई-व्हेईकलची विक्री वाढली आहे. या वाहन नोंदणीतून परिवहन कार्यालयाला 69 कोटी 79 लाख 19 हजार 188 रूपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चार चाकी वाहनांसाठी नवीन एमएच 14 केजे ही पसंती क्रमांकाची मालिका सुरू केली होती. या मालिकेत आरटीओ अवघ्या पाच दिवसात शुल्क म्हणून 85 लाख 70 हजार 500 रूपये व लिलावाद्वारे 25 लाख 58 हजार 655 असे एकूण 1 कोटी 11 लाख 29 हजार 155 रूपयांचा महसूल मिळाला आहे.

सोन्याच्या भावात मागील पंधरवड्यात काही प्रमाणात घसरण होती. पण मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या भावाने 50 हजार रुपयांचा आकडा गाठला. सोन्याचे 24 कॅरेटचे भाव 51 हजार 500 रुपये होते. सोन्याची खरेदी करण्यासाठी सोने-चांदी दुकानात दिवसभर गर्दी होती. अनेक प्रकारचे दागिन्यांची खरेदी करण्यात आली. याशिवाय चांदी, हिरेयुक्त दागिन्यांची खरेदी झाली.