दसरा मेळावा वाद विकोपाला, शिंदे गट आणि शिवसेनेत संघर्ष

0
269

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे शिवसेना कुणाची आणि पक्षाचे चिन्ह कुणाचे,असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. दरम्यान शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा हा कोण घेणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेकडून मुंबई पालिकेकडे काही दिवसांपुर्वीच अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळावी यासाठी आज मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळावा घेतला जातो. यासाठी यंदाही २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता, परंतु शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात होत.

याबाबत उद्धव ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले होते की, “तात्रिंक-मांत्रिक बाबी काहीही असो मेळावा आम्ही शिवतीर्थीवरच घेणार ,” “दसऱ्या मेळाव्याबाबत संभ्रम नाही,दसरा मेळावा होणारच,” असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र आता शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याने यावरून शिवसेना विरूद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाला ठसवायचं आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने दसरा मेळाव्यातूनच शिंदे गट निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटानं शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरू आहे.

शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत स्थानिक पातळीपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष सुरू आहे. याआधी शिंदे गटानं प्रतिशिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिंदे गट दसरा मेळाव्यासाठीही प्रयत्न करतांना दिसत आहे. आता दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त कुणाला परवानगी देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे सदा सरवणकर हे दरवर्षी दसरा मेळाव्याच्या परवाणगीसाठी अर्ज करत होते. मात्र त्यांनी यंदा शिंंदे गटात गेल्याने त्यांच्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आता याप्रकरणी काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.