दळवीनगरमध्ये 14 लाखांची रोकड जप्त

0
175

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या स्थिर संनियंत्रण पथकास (स्टॅटिक सर्व्हेलंस टीम) आज दुपारी दळवीनगरमधील भाजीमंडई परिसरात एका वाहनात सुमारे 14 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाने ही कामगिरी केली आहे. या पथकाद्वारे निवडणूक कालावधीमध्ये बेकायदेशीर वस्तू, मद्य ताडी इत्यादींची वाहतूक, रोख रकमेची वाहतूक, शस्रास्त्रे अशा बाबींवर देखरेख ठेवण्यात येत आहे. चिंचवड मधील दळवीनगर परिसरात या पथकाद्वारे तपासणी करत असताना दळवीनगर परिसरात एका खाजगी वाहनातून 14 लाख रुपयांची रोकड या पथकास आढळून आली.

याबाबत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तात्काळ आयकर विभागास कळविण्यात आले. त्यानंतर आयकर विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाईसाठी संबंधित व्यक्ती, वाहन आणि आढळून आलेली रोख रक्कम पंचनामा करुन आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. एसएसटी पथकाद्वारे चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध भागात वाहनांची तपासणी करण्यात येत असून 24×7 हे पथक कार्यरत आहे.

या पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत असून आचारसंहिताभंगाबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने बारकाईने नजर ठेवली जात आहे. हे पथक नाका, चेकपोस्ट अशा ठिकाणी तपासणी करीत आहे. या पथकामार्फत मतदानापूर्वी शेवटच्या 72 तासात कामकाज अधिक बळकट करण्यात आले आहे. मतदारांवर बेकायदेशीररित्या प्रभाव टाकणे, त्यांना प्रेरित करणे या गोष्टींवर आळा घालण्याची महत्वाची जबाबदारी या पथकावर आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरु असून कोणत्याही प्रकारे या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व सबंधित पथकांनी घ्यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही ढोले यांनी दिला आहे