दर वाढीनंतर महापालिका रुग्णालयातील भरणा 45 लाखांनी वाढला

0
575

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराच्या दरात वाढ केल्यानंतर रुग्णालयातील भरणा 45 लाखांनी वाढला आहे.

महापालिकेचे 8 रुग्णालये आणि 29 दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरील रुग्णांना उपचारार्थ आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. महापालिका प्रशासकांनी दवाखाने, रुग्णालयातील दरवाढीचा निर्णय घेतला. शासन दरानुसार निर्धारीत केलेले दर महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांकरिता 1 ऑगस्टपासून 2022 लागू केले आहेत. जे रुग्ण केशरी शिधापत्रिकाधारक आहेत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बसत नाहीत, अशा रुग्णांनाकडूनही शासनाकडील दरांनुसार दर आकारणी केली जाते.

अतिदक्षता विभाग (आसीयू), साईड रुम, सेमी प्रायव्हेट रुमच्या दरात मोठी वाढ केली आहे. नवीन दरांची 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरु झाली. तर, तांत्रिक कारणामुळे संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात 17 ऑगस्टनंतर अंमलबजावणी सुरु झाली होती. महापालिका रुग्णालयांचा जुलै महिन्यात 79 लाख 2 हजार 217 रुपयांचा भर झाला होता. नवीन दर लागू झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात 1 कोटी 24 लाख 40 हजार 621 रुपयांचा भरणा झाला. जुलै महिन्याच्या तुलनेत 45 लाख 38 हजार 404 रुपयांनी भरणा वाढला आहे.