पुणे, दि. २० (पीसीबी) – एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील दर्शना पवारची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दर्शनासोबत राजगड फिरायला गेलेल्या राहुलवर पोलिसांना संशय आहे. राहुल अद्याप फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. परंतु आता राजगडावर जात असतानाच दर्शनाने अखेरचा फोन कुणाला केला होता?, याचा खुलासा झाला आहे. १२ जून रोजी दर्शना मित्रांसोबत राजगडावर फिरायला गेली होती, त्यावेळी तिने अखेरचा कॉल कुटुंबियांना केला होता. वडिलांशी बोलल्यानंतरच दर्शना फिरायला गेली होती. परंतु त्यानंतर तिचा कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला नाही.
दर्शना पवारशी संपर्क होत नसल्याने तिचे वडील दिनकर पवार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दर्शना गडावर जात असताना दुपारी चार वाजेपर्यंत कुटुंबियांच्या संपर्कात होती. परंतु त्यानंतर वडिलांनी अनेक फोन करूनही तिचा फोन रिसीव्ह करण्यात आला नाही. पुण्यातील तरुणींकडे दर्शनाची चौकशी केली असता ती राहुल हंडोरे या तरुणासोबत राजगडवर फिरायला गेल्याचं दिनकर पवार यांनी सांगितलं आहे.
मृत दर्शना पवारचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. त्यात दर्शनाच्या डोक्यावर, मानेवर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना राहुल हांडोरे या तरुणावर संशय आहे. कारण दर्शना पवारची हत्या झाल्यापासून राहुल फरार झालेला आहे. राहुलचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच पथकं तैनात केली आहे. राजगड परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये राहुल आणि दर्शना एकत्र आत जाताना दिसत आहे. परंतु बाहेर पडताना मात्र राहुल एकटाच दिसत आहे. त्यामुळं आता या प्रकरणात संशयाची सुई राहुलच्या दिशेने जात असल्याचं बोललं जात आहे.