दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव उधळला; तिघांना अटक

0
75

तळेगाव, दि. ११ (पीसीबी)

तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका टोळीचा दरोड्याचा डाव उधळला. तिघांना दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) रात्री नॅशनल हेवी कंपनीच्या आवारात तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

कार्तिक शंकर काकडे (वय 21, रा. जांभूळ, ता. मावळ), श्रेयस उर्फ बंटी अनिल किरवे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे), गणेश उर्फ गण्या अर्जुन करडे (वय 20, रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह निखिल दत्तात्रय पोकळे (वय 22), यश गराडे (वय 20, दोघे रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार दिलीप कदम यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नॅशनल हेवी कंपनीच्या आवारात काही जण दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून टोळक्याचा डाव उधळला. पोलीस आल्याची चाहूल लागताच दोघेजण पळून गेले. त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्टल, कोयता, मिरची पावडर, लोखंडी कटावणी, 50 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असे एकूण 81 हजार 225 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. आरोपी तळेगाव दाभाडे परिसरातील एका श्रीमंत घरावर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.