दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक

0
325

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळक्याचा डाव भोसरी पोलिसांनी उधळून लावला आहे. चौघांना अटक करून त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) दुपारी पावणे दोन वाजता गावजत्रा मैदान, भोसरी येथे करण्यात आली.

निहाल संजय हुवाळे (वय 23, रा. हडपसर), राहुल संजय पांचाळ (वय 20, रा. भोसरी), महादेव बाळू जाधव (वय 23, रा. हडपसर), मयूर गुलाब काकडे (वय 20, रा. तुपेनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांचा एक साथीदार अभय उर्फ अभि गायकवाड (रा. हडपसर) हा पळून गेला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक धोंडीराम केंद्रे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील गावजत्रा मैदानात काहीजण संशयितरित्या थांबले असून ते अज्ञात ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गावजत्रा मैदानात सापळा लावला. पोलिसांनी शिताफीने चार जणांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांचा एक साथीदार पळून गेला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एक लाख 20 हजारांच्या दोन दुचाकी, 400 रुपयांचे दोन लोखंडी कोयते, चार मास्क, मिरची पूड, चार मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.