थेरगाव रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगारासाठी आंदोलन  

0
217

थेरगाव, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात  कंत्राटी पद्धतीने काम करणा-या डॉक्टर, स्टाफनर्स यांनी नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळावा यासाठी आज (सोमवारी) सकाळी काम बंद आंदोलन केले.

महापालिका प्रशासनाने सर्वांचा विरोध डावलून विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्यासाठी ठेकेदार नेमले. त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या रूग्णालयात आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी घेण्यात आले, मात्र या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याची समस्या सुरुवातीपासूनच सुरु झाली. तीन-तीन महिने ठेकेदारांकडून पगार दिला जात नाही.

नवीन थेरगाव कंत्राटी पद्धतीने काम करणा-या डॉक्टर, नर्स यांचा मागील नोव्हेंबर महिन्यांचा पगार अद्यापही झाला नाही. त्यामुळे  या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. सकाळी दहा वाजता काही वेळ आंदोलन केले. रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी आंदोलन स्थगित करून काम सुरू केले. पुन्हा दुपारी ओपीडी बंद झाल्यानंतर जोरदार आंदोलन केले.