थेरगाव येथील प्राणांतिक विद्युत अपघाताबाबत निवेदन

0
102

30 जुलै (पीसीबी) पुणे, : थेरगाव गावठाण येथे पदपथावर दोन चाकी वाहन स्टॅंडवर लावत असताना असताना माणिक येरणकर (वय ४५, रा. पवार चाळ, थेरगाव) यांचा विद्युत धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २९) रात्री ९.३० च्या सुमारास घडली. तथापि, हा प्राणांतिक अपघात महावितरणच्या वीजयंत्रणेमुळे झालेला नाही असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

   सोमवारी रात्री श्री. येरणकर पथदिव्याच्या बाजूला दोन चाकी वाहन स्टॅंडवर लावत असताना भूमिगत वीजवाहिनीमधील विद्युत प्रवाह लोखंडी स्टॅंडमध्ये आल्याने विद्युत अपघात घडल्याची शक्यता आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनेनंतर लगेचच घटनास्थळी जाऊन पाहणी केली व संबंधित फिडर पिलरमधून वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतरही सदर दोन चाकी वाहनामध्ये विद्युत प्रवाह कायम असल्याचे दिसून आले.

दरम्यान, गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड, पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मुंडे यांच्यासह संबंधित अभियंत्यांनी घटनास्थळाची आज सकाळी पाहणी केली. यामध्ये घटनास्थळी अपघातास कारणीभूत ठरलेली भूमिगत वीजवाहिनी महावितरणशी संबंधित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हा अपघात महावितरणच्या वीजयंत्रणेमुळे झालेला नाही, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याबाबत महावितरणकडून विद्युत निरीक्षक कार्यालयास कळविण्यात आले आहे. विद्युत निरीक्षकांकडून या विद्युत अपघाताचा स्वतंत्रपणे तपास करण्यात येत आहे.