थेरगाव आणि चिंचवड मधून दोन तडीपार गुंडांना शस्त्रासह अटक

0
143

चिंचवड, दि. 26 जुलै (पीसीबी) – थेरगाव स्मशानभूमी येथे बुधवारी (दि. 24) सायंकाळी साडेसात वाजता कारवाई करत गुन्हे शाखा युनिट चारने एका तडीपार गुंडाला अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. तर सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास चिंचवड पोलिसांनी चिंचवड रेल्वे स्टेशन जवळून एका तडीपार गुंडाला अटक करत त्याच्याकडून तलवार जप्त केली.योगेश उर्फ विकी कालिदास डावरे (वय 28, रा. काळेवाडी) असे गुन्हे शाखा युनिट चारने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मोहम्मद गौस नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश डावरे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने स्वतः जवळ कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट चारने त्यास अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.प्रशांत दिलीप कोकरे (वय 30, रा. चिंचवड) असे चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत कोकरे याला देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तो देखील त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शहरात आला. त्याने स्वतःजवळ तलवार हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.