थेरगावात रुग्णसेवा सोडून डॉक्टरचे भलतेच प्रताप

0
1197

-खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्यास रुग्णास भाग पाडत फसवणूक

थेरगाव, दि. 10 (पीसीबी) – रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर डॉक्टरने बिल भरण्याच्या नावाखाली एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन बिल भरण्यास सांगितले. त्यानंतर रुग्णाने कर्ज काढले तसेच विम्याचे पैसे आल्यानंतर तेही जमा केले. मात्र डॉक्टरने काढायला लावलेल्या कर्जाचे पैसे डॉक्टरने परत न करता रुग्णाची फसवणूक केली. हा प्रकार 22 सप्टेंबर ते 21 डिसेंबर 2022 या कालावधीत केअर लाईफ लाईन हॉस्पिटल, थेरगाव येथे घडला.

डॉ. किरण किसन थोरात (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी विनोद राजेंद्र जाधव (वय 30, रा. डुडुळगाव, ता. हवेली) यांनी गुरुवारी (दि. 9) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांना थंडी ताप आल्याने ते 22 सप्टेंबर 2022 रोजी थेरगाव येथील केअर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये गेले. जाधव यांची आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स पॉलीसी असल्याबाबत सर्व कागदपत्रे दाखवली. जाधव यांचा अॅडमिट कालावधीतील सर्व खर्च पॉलीसी मधून होईल, असे सांगितले. 22 ते 29 सप्टेंबर या कालावधीत जाधव रुग्णालयात होते. डिस्चार्ज देताना डॉक्टरने जाधव यांना त्यांचा कॅशलेस विमा क्लेम झाला नसल्याचे सांगितले. हॉस्पिटलचे बिल देण्यासाठी जीमनी फायनान्स कंपनी कडून कर्ज करून 82 हजार 495 रुपये बिल भरण्यास सांगितले.

जाधव यांच्याकडून पॅनकार्ड, आधारकार्ड अशी कागदपत्रे घेऊन इतर कागदपत्रांवर जाधव यांच्या सह्या घेतल्या. जाधव यांना विम्याचे पैसे मिळाल्यावर त्यांनी 61 हजार 900 रुपये ऑनलाईन पाठवले. आरोपीस एकूण एक लाख 44 हजार 495 रुपये मिळाले. त्यानंतर जाधव यांनी काढलेल्या कर्जाचे आरोपीने तीन हप्ते भरले. त्यानंतर हप्ते भरले नाहीत. तसेच त्यांची उर्वरित 73 हजार 599 रुपये रक्कम न देता फसवणूक केली. हप्ते भरा, असे सांगण्यासाठी जाधव गेले असता आरोपीने त्यांना मारहाण व शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.