थेरगावच्या श्रृती उबाळेला शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

0
128

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील श्रृती दत्तात्रेय उबाळे हिला भ्रमणध्वनी या चित्रपटातील भूमिकेबद्दल राज्य सरकारचा उत्कृष्ट प्रथम पदार्पन पुरस्कार मिळाला आहे. दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या नावाने हा पुरस्कार असून बुधवारी (दि. २२) मुंबई येथे समारंभपूर्वत वितरण झाले.

महेंद्र त्रिपाठी निर्मित आणि दिग्दर्शित भ्रमणध्वनी या चित्रपटात श्रृती हिची प्रमु भूमिका आहे. आजवर तिने जांभूळ, तिरसाट अशा दोन चित्रपटांतून काम केले आहे. अभिनायासाठी कुठलेही विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. वडिल दत्तात्रेय उबाळे यांच्याकडून मी सर्व धडे घेतले, असे श्रृती सांगते. स्वतः दत्तात्रेय उबाळे हे नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांतून काम केले आहे. पिपाणी हा त्यांचा गाजलेला चित्रपट. मिसेस मुख्यमंत्री, तुला पाहते रे, संत ज्ञानेश्वर माऊली, आप्पी आमची कलेक्टर, लाखात एक आमचा दादा आदी मालिकांतूनही दत्तात्रेय उबाळे यांनी काम केले आहे. भ्रमणध्वनी या चित्रपटातही श्रृती हिचे शिक्षक म्हणून दत्ता उबाळे यांची भूमिका आहे. मोबाईलच्या वापरावर आधारीत वास्तवदर्शी हा चित्रपट खूप भावतो.

 

श्रृती ही अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण थेरगाव येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालय, येथे झाले. मॉडर्न महाविद्यालयात फिजिओथेरपीचे शिक्षण घेते आहे. पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना श्रृती सांगते, हा पहिलाच असा शासनाचा पुरस्कार मला मिळाला याचा निश्चितच आनंद आहे. याच चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळालेला आहे. खरे तर, पुरस्कार मिळेल असा विचारही मी केला नव्हता. याचे सर्व श्रेय मी पूर्णतः माझे वडिल आणि चित्रपटाच्या टीमला देते. पुरस्काराबद्दल मला कळविलेच नाही त्यामुळे तो स्वीकारण्यासाठी जाता आले नाही, याची खंत आहे.