थीम पार्कचे काम वेळेत आणि काटेकोर नियोजनासह पूर्ण करा – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

0
3

पिंपळे सौदागार येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील ‘वेस्ट टू वंडर थीम पार्क’ला भेट देत घेतला कामाचा आढावा

पिंपरी, दि .२२ (पीसीबी) : वेस्ट टू वंडर थीम पार्कचे काम पुढील दोन महिन्यांत काटेकोर नियोजनासह पूर्ण करा. उद्यानात उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रत्येक प्रतिकृतीचे काम दर्जेदार करण्यात यावे. हे उद्यान अधिक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण होण्यासाठी प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले.

अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील ‘वेस्ट टू वंडर थीम पार्क’ला भेट देत सुरू असलेल्या सर्व कामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांनी पार्कमधील फूड स्टॉल, नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा, तिकीट काउंटर, सुशोभीकरणाच्या दृष्टिने वृक्ष लागवड, वास्तूंची सुरक्षितता, सुरक्षा रक्षकांची नेमणूक, कंपाऊंड भिंतीचे काम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रंगरंगोटी तसेच स्थापत्य व विद्युत विभागाशी संबंधित विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.

विद्युत रोषणाईसह इतर विद्युत विषयक कामे महावितरण विभागाशी समन्वय साधत मार्गी लावा, बांधकाम परवानगी तसेच इतर स्थापत्य विषयक कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. यावेळी कामातील गॅप अॅनालिसिसची तपासणी करून उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी सह शहर अभियंता मनोज सेठीया, माणिक चव्हाण, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक योगेश वाळूज, कार्यकारी अभियंता वि. के. जाधव, सचिन नांगरे यांच्यासह स्थापत्य, विद्युत, उद्यान अशा विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, ‘वेस्ट टू वंडर थीम पार्क हे पिंपरी चिंचवडकरांसाठी एक वेगळे आकर्षण ठरेल. येथे टाकाऊ वस्तूंपासून उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक वास्तूची गुणवत्ता उच्च दर्जाची असावी. हे उद्यान अधिक वैशिष्ट्यपूर्ण होण्यासाठी प्रत्येक बाब काटेकोर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावी. या उद्यानातील सर्व सुविधा व्यवस्थित असल्या पाहिजेत. पुढील दोन महिन्यांत या उद्यानाचे सर्व काम वेळेत पूर्ण करण्यात यावे,’ असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
…..
टाकाऊ साहित्यापासून उभ्या राहत आहेत ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती!

वेस्ट टू वंडर थीम पार्कात जगभरातील १७ जागतिक दर्जाच्या ऐतिहासिक आणि कलात्मक वास्तूंच्या प्रतिकृती टाकाऊ साहित्यापासून उभारल्या जात आहेत. यामध्ये ताजमहल, आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, लीनिंग टॉवर ऑफ पिसा, सिडनी ऑपेरा हाऊस, अजंठा लेणी, ला सागराडा फॅमिलीया, चिचेन इत्झा, पिरॅमिड ऑफ गिझा, पेट्रा ऑफ जॉर्डन, कोलोसियम ऑफ रोम, बिग बेन ऑफ लंडन, अंकोर वट ऑफ कंबोडिया, हंपी चारियट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ट्रेव्ही फाउंटन आणि माऊंट रश्मोर आदी जगप्रसिद्ध कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतींमुळे उद्यानाला जागतिक वारशाची झलक मिळणार असून पर्यावरणपूरक पद्धतीने टाकाऊ साहित्याचा अभिनव उपयोग येथे केला जात आहे.
…….
साधु वासवानी उद्यानात केली पाहणी

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग प्रभागातील साधु वासवानी उद्यानाला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी उद्यानाचे सुशोभीकरण करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उद्यानातील मोकळ्या जागेत आकर्षक सुशोभिकरण करावे, उद्यानात ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत, दिव्यांगाना प्रवेश सुखकर करण्याच्या दृष्टिने उपाययोजना कराव्यात, पावसामुळे उद्यानात साचणाऱ्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी दिले.