थर्ड आय – अविनाश चिलेकर शत प्रतिशत भाजप घुसमटलेले विरोधक

0
11

ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना, सदस्य संख्या आदी मुद्यांवर
सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणे जानेवारीत निकाली होतील आणि साधारणतः मार्च-एप्रिल दरम्यान महापालिका निवडणुका होतील असा अंदाज आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी नागपुरात त्याबाबतचे सुतोवाच केले. सरकारमधील दोन सर्वोच्च नेते बोलतात यात १०१ टक्का तथ्य आहे. कारण निवडणूक आयोग, न्यायालय, प्रशासकिय यंत्रणा सगळे सगळे त्यांच्याच हातात आहे. आज परिस्थिती अशी आहे की, ते सांगतील ती पूर्व दिशा असते. म्हणूनच ठोसपणे सांगता येते, येत्या तीन महिन्यांत निवडणुका होतील.

लोकसभा, विधानसभा झाली आता ही मिनी विधानसभा होणार. मोदींची हॅट्रीक झाली, फडणवीस पुन्हा येणार म्हणाले होते, ते आले. इजा, बिजा, तिजा होणार. भाजप विरोधात प्रचंड हवा, सगळे अहवाल, पोलिस आणि माध्यमांचे रिपोर्ट असतानाही १३२ भाजपच्या जागांसह २३० संख्याबळ महायुतीला मिळाले. ठाकरे, पवार, पटोलेंची मती गूंग झाली. विरोधात लढणारे तमाम नेते, कार्यकर्ते हतबल झाले. सगळे अनुकूल असताना प्रतिकूल कसे झाले याचाच तपास लागत नाही. घोळ, घोटाळा, गोलमाल नक्की काय ते कोणालात समजत नाही. ईव्हीएम मधील झालेले एकूण मतदानाचे आकडे, व्हीव्ही पॅट मधील आकडे यात तफावत होती. अनेक उमेदवारांची मते जवळपास सारखी होती. बूथनिहाय मतेसुध्दा सेम टू सेम असल्याचे आढळले. अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संशयकल्लोळ झाला आणि प्रकरण न्यायालयात गेले. अपेक्षेप्रमाणे न्यायालयाने ते फेटाळले. आता भाजप विरोधात लढण्याच्या मनस्थितीतसुध्दा महाआघाडीचे नेते नाहीत. छप्पर फाडके मिळाल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे गुळणी धरून बसलेत. सगळे खिंडीत साप़लेत म्हणून आता भाजपने शतप्रतिशतचा नारा सुरू केलाय. महायुती आणि महाआघाडीचे सगळेच घटकपक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत. राज्यातील २९ महापालिका, ३६ जिल्हा परिषदा, अडिचशेवर नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती मिळून साडेसात हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

पिंपरी चिंचवडला सबकूछ भाजप –
पिंपरी चिंचवड महापालिकेत चार प्रभागांची रचना मिळून ३२ प्रभागांत १२८ नगरसेवक होते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे ७७, राष्ट्रवादी ३६, शिवसेना ९, मनसे १, रिपाई १, अपक्ष ४ असे संख्याबळ होते. आता फडणवीस आणि बावनकुळे यांच्या संदेशानुसार भाजप सर्व जागा लढणार. अजित पवार म्हणतात राष्ट्रवादीचे आम्हीसुध्दा सर्व जागांवर उमेदवार देणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत सांगतात की, आम्ही स्वतंत्र लढणार. काँग्रेससुध्दा वेगळी लढण्याच्या मूडमध्ये आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी अजून पराभवातून सावरलेली नाही मात्र, तेसुध्दा वेगळे लढणार असल्याचे सुतोवाच नेत्यांनी केले आहे. शिंदे यांची शिवसेना तळ्यात मळ्यात करते. सर्व जागा लढायची ताकद फक्त भाजपकडे आहे. जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो असतो. केंद्रात, राज्यात भाजप आहे म्हटल्यावर कामे व्हायचीच तर गल्लीतसुध्दा भाजप पाहिजे, हे प्रचाराचे सूत्र आह. नगरसेवक पदासाठी उमेदवार कोण, त्याचा अभ्यास, चारित्र, कार्यक्षमता, वक्तृत्व, कार्यकर्त्यांचे संख्याबळ, संघटन कौशल्य आणि पैसा किती त्याला महत्व राहिलेले नाही. ईव्हीएम चमत्कार घडवणार आणि तोच उमेदवार विजयी होणार, ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. सत्य हेच असल्याने आयुष्य समाजसेवत कार्यकर्ता म्हणून घालवलेले भलभले हतबल आहेत. २४ तास लोकांसाठी खस्ता खाल्लेले रथीमहारथी आता निवडणूकच नको म्हणू लागलेत. भाजप सोडून कोणत्याही पक्षाची उमेदवारी घ्यायच्या मनस्थितीत कार्यकर्ते नाहीत. सत्ता, संपत्ती, यंत्रणा सगळे भाजपच्या हातात आहे. शहरात भाजपकडे असलेले कार्यकर्त्यांचे बळ, मजबूत संघटन, नेते मंडळींची ताकद सगळे एका तागडीत आहे. ईव्हीएम सुध्दा भाजप सांगेल तेच निकाल देते. म्हणूनच सबकूछ भाजप.

अजितदादांची राष्ट्रवादी काय करणार ? –
पिंपरी चिंचवड शहरात आज सर्वात मोठा प्रश्न आहे तो अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा. दादांनी भाजपला नडणे आणि लढणेही सोडल्याचे स्थानिक कार्यकर्ते, नेते रोज पाहतात. दादा किती हतबल आहेत ते पाहून आपले काय होणार, याची चिंता आता तमाम पदाधिकाऱ्यांना लागून राहिली आहे. तब्बल २०-२२ वर्षे या शहरावर एकहाती सत्ता ज्यांनी उपभोगली, अधिराज्य गाजवलेले त्या दादांची परिस्थिती आज आयाळ झडलेल्या सिंहासारखे झाली आहे. भाजप सर्व जागा लढणार म्हटल्यावर किमान एक ओळीची प्रतिक्रीया द्यायची हिंमतसुध्दा शहर राष्ट्रवादीत उरलेली नाही. प्रा. रामकृष्ण मोरे सरांची सत्ता अशीच होती पण अजित पवार यांनी ती नेस्तनाबूत केली. आज काळाने सूड उगवला आणि दादांनासुध्दा या शहरातील सत्ता जवळपास गुंडाळायची वेळ आली. दादांना सोडून शरद पवार यांच्याकडे गेलेले पुन्हा दादांकडे यायचे की नाही यावर हजारदा विचार करत आहेत. शेकडो कार्यकर्ते आज तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. असे कोंडी झालेले इच्छुक राजकारणातील गाशा गुंडाळायच्या विचारात आहेत. कशासाठी आणि कोणासाठी वैर पत्करायचे, असे अनेकांचा बोल आहेत. महापालिका निवडणूक होणार म्हटल्यावर गल्लोगल्ली इच्छुक कार्यकर्त्यांची कार्यालये सुरू होत असतं. घरोघरी गाठीभेटी, नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे होत. नुसता जल्लोष असायचा. आता तीन महिन्यांवर निवडणूक होण्याचे भोंगे वाजले मात्र, कोणी एक शब्द बोलत नाहीत. सगळीकडे निव्वळ स्मशान शांतता आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भोसरी, पिंपरी, चिंचवड अशी तीनही विधानसभांतून उमेदवार दिले होते. पराभवानंतर ते दिसेनासे झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यालयालयात शुकशुकाट आहे. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी… म्हणत फिरणारा नेता, कार्यकर्ता दिसायला तयार नाही. काँग्रेस आता या शहरात नावालाही शिल्लक राहिलेली नाही. आंदोलन करायचे तर किमान फोटोपुरते आठ-दहा कार्यकर्ते गोळा व्हायचे आता त्यांचेही अवसान गळाले. ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा तोरा होता, आता पार बोऱ्या वाजलाय. शिंदेंचे एकमेव खासदार श्रीरंग बारणे सोडले तर या शहरात नाव घ्यावे असे कोणी साप़डत नाही. भाजप सोडून हे सगळ्या राजकीय पक्षांना महापालिकेला १२८ उमेदवार कोठून मिळणार हा प्रश्न आहे. मुळात इतके एकतर्फी वातावरण कधीच नव्हते आणि ते नसावे. लोकशाही टिकवायची तर किमान विरोधक पाहिजे. घोडे मैदान अगदी जवळ आहे, तोवर जय म्हणा जय श्रीराम.