दि. १९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर भाजप अलिकडे प्रचंड अस्वस्थ आहे. रोज एक एक बलदंड नेता पक्ष सोडून जातोय. पक्षात काहीच अलबेल नाही. घरानेशाही आणि मनमानी शहराध्यक्षांना कंटाळून वाकड प्रभागातले स्वसामर्थ्यावर राजकारणात आलेले माजी नगरसवेक संदीप कस्पटे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांच्यासारखे १५ माजी नगरसवेक भाजपवर नाराज आहेत. कस्पटे यांच्या पाठोपाठ राम वाकडकर यांच्या सारख्या ताकदिच्या नेत्यानेही भाजपला रामराम केला आणि शरद पवार यांना भेटून दिशा स्पष्ट केली. विधानसभेला शहराध्यक्ष शकंर जगताप यांना संधी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही, अशी उघड भूमिका या कंपुने घेतली आहे. दोन-चार दिवसांनी एक एक करत पक्ष सोडायचा आणि दणका द्यायचा विचार हे सगळे करतात. आपापल्या भागात ज्यांचे वर्चस्व आहे असे हे स्थानिक नेते खरे तर भाजपचा मोठा आधार.
आता तेच पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने प्रचंड अस्वस्थता आहे. शत्रुघ्न काटे यांचे पिंपळे सौदागरमध्ये चालते, आता त्यांच्या नेतृत्वाखाली १५ माजी नगरसेवक मिळून खदखद बोलून दाखवतात. रहाटणीतील चंद्रकांत नखाते यांनी बंड पुकारले आणि थेट विधानसभेचा प्रचार सुरू केला. संतोष बारणे, माया बारणे या पती-पत्नीने २० वर्षे थेरगावात स्वतःचे वर्चस्व कायम राखले. पक्षाने दुर्लक्ष केले म्हणून त्यांनी भाजप सोडला. पिंपळे निलखचे एकखांबी नेते तुषार कामठे यांनी जगताप कुटुंबाच्या विरोधात एल्गार पुकारला आणि अखेर भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाले. जगताप यांच्यामुळे नगरसेवक झालेले पिंपळे गुरव-वैदू वस्तीचे दुसरे पती-पत्नी राजू रामा लोखंडे आणि चंदा लोखंडे यांनी मागेच भाजपला रामराम ठोकला. काळेवाडीच्या तापकिर कुटुंबाचा आजही त्या भागात मोठा दबदबा आहे. त्या कुटुंबातील माजी नगरसेविका सुनिता तापकिर, राज तापकिर हे भाजप सोडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. आमदार लक्ष्मण जगताप हयात असताना यापैकी कोणी ब्र शब्द काढला नाही, कारण त्यांचा वचक होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या धर्मपत्नी अश्विनीताई जगताप यांच्यावरही कोणीच नाराज नव्हते, कारण त्यांचा वैयक्तीक कधी त्रास कोणालाच नव्हता.
केवळ पैशाने सर्व काही विकत घेता येते, असाच भाजपच्या राजकारणाचा फंडा झाला आणि तिथेच माती झाली. चिंचवड विधानसभेला आज भाजप विरोधात सर्व शक्ती एकवटल्यात. भाजपमधील फुटीर मंडळींचे सोडा, जेष्ठ माजी नगरसवेक भाऊसाहेब भोईर, तीन वेळा विधानसभा लढवलेले राहुल कलाटे, दोन वर्षांपूर्वी पोट निवडणुकित ९९ हजार मते घेतलेले नाना काटे असे सगळे बलाढ्य भाजपचा आमदार होऊच नये यासाठी उभे ठाकलेत. शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, मोरेश्वर भोंडवे, सिध्देश्वर बारणे, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक अरुण पवार अशी मोठी जंत्री आहे. भाजप संलग्न अपक्ष थेरगावचे माजी नगरसेवक कैलास बारणे यांनीसुध्दा भाजप सोडली. महापालिकेला ७ हजार मते घेऊन पराभव झाला, पण नंतर नव्या दमाने स्वतःच्या ताकदिवर १० हजार मतदारांचा चाहता झालेला राम वाकडकर सारखा उद्योजकसुध्दा भाजप सोडतो, तेव्हा विचार करण्याची वेळ येते. भाजपमध्ये कुठेतरी चुकते आहे हे नक्की. भाजपला हे सगळे रथीमहारथी कस्पटासमान वाटत असतील तर काळच त्यांना माफ करेल. वेळ प्रसंगी सगळे एकत्र मिळून भाजप उमेदवाराचा पराभव करायच्या हालचाली सुरू आहेत. तसे प्रत्यक्षात होऊ शकते, कारण २०१९ च्या निवडणुकित राहुल कलाटे यांनी आमदार जगताप यांच्या विरोधात दिलेली लढत त्याचसाठी लक्षवेधी ठरली होती.
आज जे चिंचवडला आहे तेच आज भोसरी विधानसभेत आहे. दोन टर्म आमदार राहिलेल्या महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भाजपचे ३३ माजी नगरसेवक अस्वस्थ आहेत. जर का भोसरी विधानसभेतील एकूण ४६ पैकी ३३ माजी नगरसेवकांचा श्वास गुदमरला असेल तर पक्ष इथे जीवंत राहणार का, हा प्रश्न आहे. सर्व नाराज नगरसेवक का नाराज आहेत, याचा साधा विचारही भाजपचे नेते करत नाहीत. तू नाही तर तुझा बाप दुसरा, अशा तोऱ्यात अन्य पर्याय तयार केल्याने ही सगळी फौज या विधानसभेला भाजपच्या विरोधात ठाकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आमदार लांडगे यांनी भाजपचे प्रथम महापौर म्हणून नितीन आप्पा काळजे यांना संधी दिली होती. आगामी काळात त्यांचे नाव आमदारकीचे इच्छुक म्हणून लोक घेऊ लागले म्हणून अखेर काळजे यांचा कार्यक्रम केला. भाजपच्या सत्ता काळात पाच वर्षे महापालिकेत सत्ताधारी नेता म्हणून निष्ठावंतांपैकी एक असलेल्या एकनाथ पवार यांनी धुरा सांभळली. २००९ मध्ये त्यांनी भाजपकडून भोसरी विधानसभा लढवली आणि ५० हजार मते घेतली होती. विलास लांडे आणि नंतर महेश लांडगे यांच्या गावकी-भावकीच्या राजकारणत इथे भाजपकडून आमदार होता येणार नाही हे पवार यांना ओळखले. भाजप सोडून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मधून तयारी केली. कदिचित ते आमदार म्हणूनच शहरात येतील.
रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक. शहरात ज्यांनी भाजपचे बस्तान बसवले त्या दिवंगत अंकुश लांडगे यांचे सख्खे पुतणे. त्यांचे वडिल बाबासाहेब लांडगे हेसुध्दा नगरसेवक होते. त्यांची सख्खी काकी म्हणजे अंकुश लांडगे यांची पत्नीसुध्दा भाजप नगरसेविका होती. हे आख्खे घराणे आता भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत गेले. मनी, मसल पॉवर म्हणून आमदार लांडगे यांना तोडिस तोड म्हणून रवी लांडगे आता भाजप विरोधात उभे राहिलेत. हे असे का घडले, इतकी घसरगुंडी का झाली याचा विचार ना फडणवीस यांनी केला ना बावनकुळेंना केला. नगरसेवकांनी केलेली महापालिकेतील सर्वच कामे आमदारांनी स्वतः केल्याचे सांगून श्रेय घेतले. एकालाही मोठे होऊ दिले नाही म्हणून ३३ माजी नगरसेवकांचे अक्षरशः खच्चीकरण झाले. ती साठलेली नाराजी आता बाहेर येतेय. विधानसभेसाठी जसा उद्रेक चिंचवडला झाला त्यापेक्षा मोठा भोसरीत होऊ शकतो. प्रचंड खदखद आहे, अस्वस्थता आहे. मोशी पंचक्रोशित ज्यांनी प्रसंगी स्वतःच्या पैशातून विकास कामे केलीत ते माजी नगरसेवक वसंत बोराटे भाजप पासून दुरावले. चिखली परिसरातून नाव कमावलेले संजय नेवाळी यांच्यासारखे उद्योजक माजी नगरसेवक नाराज झाले. खुद्द आमदार लांडगे यांच्या भोसरी गावातील एक शिक्षण संस्था चालक माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी भाजप सोडली. शरद पवार यांच्या निशाण्यावर भोसरी विधानसभा आहे आणि त्यांनी बारीक लक्ष घातले तर भाजपचा सुपडा साफ व्हायला वेळ लागणार नाही. भाजपला ही अस्वस्थता खूप महागात पडू शकते.