थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
134

अजित गव्हाणे यांचे पक्षांतर, महेश लांडगेंचे काय होणार…

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील अनेक भूकंप अलिकडे जनतेने अनुभवले. पिंपरी चिंचवडच्या राजकारणातही असाच एक मोठा भूकंप झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आज सकाळी लगेचच सर्व सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. भोसरीतील अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास संपूर्ण खाली झाली. फक्त गव्हाणे हेच नाहीत, तर त्यांच्या सोबत ३३ माजी नगरसेवकांची फौज आहे. भाजपमधून यापेक्षाही मोठा कंपू अस्वस्थ असून तोसुध्दा नजिकच्या काळात दुसऱ्या किनाऱ्याला जायच्या तयारीत आहे.
आजच्या पक्षांतरातील रथी महारथींची नावे वजनदार, ताकदिची आणि तितकीच बोलकी आहेत. माजी महापौर आझम पानसरे, हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर यांच्यासह नावांची यादी वाचली तरी पुढच्या राजकारणाची दिशी स्पष्ट होते.
अगदी दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असताना गव्हाणे यांनी राजीनामा देणे हे दिसते तितके सरळ नाही. शहराच्या संपूर्ण राजकारणालाच कलाटणी देणारी ही घटना आहे. उच्च शिक्षित, अभ्यासू, मितभाषी तसेच अत्यंत संयमी, सभ्य, सुसंस्कृत असे नेतृत्व राजकारणात शोधून सापडत नाही, ते सर्व गव्हाणे यांच्यात ठासून भरले आहे. उद्या शहराचे नेतृत्व करू शकतील असे हे काळाच्या पलिकडे पाहणारे दूरगामी नेतृत्व. आज त्यांची गरज होती आणि तसे झाले म्हणूनच या घडामोडीला महत्व आहे.

भाजपच्या सत्ताकाळात आणि अडिच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत हे शहर बुडाले. भाजपच्याच आमदारांनी करदात्यांनी भरलेली तिजोरी अक्षरशः खाली केली. खंडणीखोर, हप्तेखोरांचा सुकाळ झाल्याने व्यापारी, उद्योजकांसह सामान्यजनता जाम वैतागली. भाजपच्या लायसनवर जमिनी बळकावणाऱ्यांची एक टोळीच शहरात राज्य करते की काय, अशी गंभीर परिस्थिती आहे. रा.स्व.संघासह निष्ठावंत भाजपची मंडळीसुध्दा या कारभाराने त्रस्त आहेत, तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत. लोक आणि प्रामाणिक, सुजान कार्यकर्ते हतबल आहेत. दादांचीच राष्ट्रवादी भाजपच्या मांडिला मांडी लावून बसल्याने सर्वांचीच कुचंबना झाली होती. गेल्या विधानसभेला भाजप उमेदवारांच्या म्हणजे महेश लांडगेंच्या विरोधात गरळ ओकली होती. जिवाच्या आकांताने विरोधात प्रचार केला होता. आता या विधानसभेला महायुतीत त्यांच आमदारांची तळी उचलायची वेळ येणार होती. पिंकलेले हे गळू ठसठसत होते ते आज फुटले. गव्हाणे यांनी या भावनांचे संकलन केले आणि त्या नाराजांचे नेतृत्व केले. लोकांच्या अपेक्षेला ते उतरतात का ते पहायचे. भोसरी विधानसभेपूरते हे प्रकरण नाही, तर चिंचवड, पिंपरी विधानसभेतही तीच खदखद आहे. महत्वाचे म्हणजे फक्त दादांच्याच राष्ट्रवादीत नाही. भाजपमध्येसुध्दा आगामी महिनाभरात मोठा भूकंप अपेक्षित असून त्यांचे हलकेसे धक्के जाणवत आहेत. फडणवीस-बावनकुळे यांनी दखल घेतली नाही तर भाजपला शहरातून बस्तान गुंडाळायची वेळ येईल.

आमदार महेश लांडगेंसाठी धोक्याची घंटा –
अजित गव्हाणे यांचा दादांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कोणाला भोवणार, तर पहिले नाव येते ते आमदार महेश लांडगे यांचे. दोन टर्म भाजपच्या पंखाखाली आमदार लांडगे यांनी मर्जीनुसार यथेच्छ राजकारण केले. भोसरी मतदारसंघात त्यांनी निवडूण आणलेले भाजपचेच नगरसेवक आता त्यांच्या विरोधात उघडपणे बोलतात. नगरसेवकांनी पाच वर्षांत केलेली सर्व कामे आमदार लांडगे यांनी स्वतःच्या खात्यात जमा केली. शेतात नांगरट किंवे पेरणी करताना गवत खाऊ नये म्हणून बैलांच्या मुस्क्या बांधतात, अगदी तशी नगरसेवकांची अवस्था होती. आमदार लांडगेंनी त्यांच्या दावनीला सगळे बांधून ठेवले होते, आता ते मोकळे झालेत आणि गव्हाणे यांच्यासारखी मूळ भाजप संस्कारात वाढलेला सभ्य नेता मिळालाय. प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्याला बजावून सांगत की, रयतेच्या शेतातील काडिलाही धक्का लागता कामा नये. भोसरीत शेतातील काडीचे सोडा शेतच लुटल्याने प्रजा संतापली आहे. शेकडो दाखले देता येतील. भोसरीत टपरी, हातगाडी, भाजीवाले, रिक्षाचालकांसह सर्व किरकोळ व्यापाऱ्यांना तमाम कारखानदारांना हप्ते द्यावे लागतात. सर्व बिल्डर प्रचंड दहशतीखाली आहेत. हप्ता किंवा भागीदारी द्यावी लागते, अन्यथा धंदा करता येत नाही, असे वातावरण आहे. शितलबागेतील ७० लाखांचा पादचारी पूल सात कोटींना दाखवून लूटमार सुरू झाली. उस गोड लागला म्हणून मुळासकट खायला लागले. भामा आसखेड जॅकवेल प्रकरणात ३० कोटींची लूट झाली. संतांच्या नावानेही दरोडेखोरी झाली. समाजाचे प्रबोधनासाठी अभ्यासू किर्तनकार, प्रवचनकार तयार व्हावेत म्हणून चिखली येथे ४२ कोटींचे संतपीठ उभे केले आणि तो आख्खा प्रकल्प एका खासगी सीबीएसई स्कूल चालकाला अंदान दिला. छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा उभारण्यासाठी ३२ कोटींचा चौथरा उभा केला आणि नंतर स्मारकाची जागाच बदलली. मोशी कचरा डेपो वर शेकडो कोटी खर्च केले आणि स्वतःचे दुकान लावले. नमामी इंद्रायणी नावाखाली दरवर्षी जत्रा भरवली, सायकल स्पर्धा घेतली पण इंद्रायणी फेसाळलेलीच आहे. जलपर्णी हटविण्यासाठी कधीच नव्हते इतका मोठा म्हणजे २४ कोटी रुपये खर्च तीन नद्यांवर केला तो कोणाच्या खिशात गेला माहित नाही, मात्र जलपर्णी कायम आहे. मारुतीच्या शेपटीसारखी ही जंत्री मोठी आहे. घडा भरलाय, तो फुटायची वेळ आलीय. गव्हाणे आता त्यावर टिचकी मारणार म्हणून भोसरीतील भाजपमध्ये घबराट आहे. कोणाला कधी साधी चापट मारली नाही की शिवीगाळ केली नाही, असा गव्हाणे यांचा स्वभाव. चार गुंडांना हाताशी धरून हाणामाऱ्या कऱणे, दहशत पसरवणे हे त्यांच्या गावीसुध्दा नाही. आता भोसरीच्या महाभारतात श्रीकृष्णाचा रोल गव्हाणे यांना करावा लागेल. इंद्रायणीतील कालियाचे मर्दन करायचेच तर यंत्र, मंत्र, तंत्र सगळे हाताळावे लागेल. ठकास महाठक होऊन लढावे लागेल. एकास एक लढत झाली तर गव्हाणे यांच्या मागे मोठी ताकद उभी राहू शकते हे लक्षात आल्याने जमीन हादरली आहे.